अमेरिकन खुली टेनिस स्पर्धा

न्यु यॉर्क :  यंदाच्या विम्बल्डन खुल्या टेनिस स्पर्धेचा विजेता व गतविजेत्या नोव्हाक जोकोव्हिच याने गुरुवारी अमेकिन खुल्या टेनिस स्पर्धेत पुरुष एकेरीची उपांत्य फेरी गाठली. तसेच जपानच्या केई निशिकोरीने आणि महिला एकेरीत नाओमी ओसाका व गतउपविजेत्या मॅडिसन कीजने यांनीसुद्धा उपांत्य फेरीतील स्थान पक्के केले. कोणत्याही ग्रँड स्लॅम स्पर्धेच्या इतिहासात प्रथमच जपानच्या दोन खेळाडूंनी उपांत्य फेरीत धडक मारली आहे.

२१व्या मानांकित निशिकोरीने सातव्या मानांकित मरिन चिलिचवर २-६, ६-४, ७-६, ४-६, ६-४ अशी संघर्षमय सामन्यात मात केली. गेल्या वर्षी मनगटाच्या दुखापतीमुळे निशिकोरीला या स्पर्धेला मुकावे लागले होते. सहाव्या मानांकित जोकोव्हिचने जॉन मिलमनवर ६-३, ६-४, ६-४ असा विजय मिळवला. उपांत्य फेरीत निशिकोरी व जोकोव्हिच एकमेकांसमोर उभे ठाकणार आहेत.

जपानच्या टेनिसच्या इतिहासात २२ वर्षांत प्रथमच ग्रँड स्लॅम स्पर्धेची उपांत्य फेरी गाठण्याचा मान मिळवणाऱ्या ओसाकाने लेसिया सुरेन्कोचा ६-१, ६-१ असा फडशा पाडला. ओसाकाने हा सामना अवघ्या ५७ मिनिटांत जिंकला. १४व्या मानांकित कीजने कार्ला सुआरेझला ६-४, ६-३ असे नमवले. कीजने नेट जवळून प्लेसिंगच्या फटक्यांचा सुरेख वापर केला. उपांत्य फेरीत कीजपुढे ओसाकाचे आव्हान असणार आहे.