रॉजर फेडरर, राफेल नदाल, मारिया शारापोव्हा या दिग्गजांना अल्पावधीतच गाशा गुंडाळावा लागल्याने विम्बल्डननगरीत आश्चर्यकारक निकालांची मालिकाच सुरू झाली होती. मात्र जेतेपदासाठी दावेदार असणाऱ्या नोव्हाक जोकोव्हिचने प्रतिस्पध्र्याना चमत्काराची कोणतीही संधी न देता विजयासह उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली आहे. जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेल्या जोकोव्हिजने १३व्या मानांकित टॉमी हासवर ६-१, ६-४, ७-६(४) अशा सरळ सेट्समध्ये विजय मिळवला. यावर “दोन वर्षांपूर्वीच्या खेळापेक्षा यावर्षी मी चांगले टेनिस खेळतो आहे. त्याबद्दल मला आनंद आहे. क्रमवारीत अव्वल स्थानावर असल्यामुळे त्यादृष्टीकोनातून उत्तम खेळी करणे महत्वाचे आहे याची मला कल्पना आहे” असे जोकोव्हिच म्हणाला.
१३व्या मानांकित हासने मियामी स्पर्धेत जोकोव्हिचवर मात केली होती तसेच २००९मध्ये विम्बल्डन स्पर्धेतच उपांत्यपूर्व फेरीतही हासने जोकोव्हिचला पराभूत केले होते. त्यामुळे हासला कमी लेखण्याची चूक जोकोव्हिचने केली नाही. “माझ्या दृष्टीने सामना अतिशय रोमांचक झाला. तिसऱया सेटमध्ये अतितटीची लढत झाली. असेरीस तिन्ही सेट जिंकण्यात मला यश आले याचा मला आनंद आहे.” असेही जोकोव्हिच म्हणाला.