जागतिक क्रमवारीतील अव्वल असलेला टेनिसपटू नोवाक जोकोविच याला करोनाची लागण झाली. मंगळावारी डेली मेल रिपोर्टने यासंबंधीचे वृत्त दिले. नोवाक जोकोविचने सर्बिया आणि क्रोएशिया येथील आड्रिया टूर (Adria Tour) टेनिस स्पर्धेत सहभाग घेतला होता. तिथे दोन कार्यक्रमांमध्ये त्याने सहभाग नोंदवला होता. इतर काही खेळाडूंना करोनाची लागण झाली असल्याचं समोर आल्यानंतर जोकोविचनेही करोना चाचणी केली असता त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला. जोकोविच या दौऱ्यात ज्या कार्यक्रमात गेला होता, तेथे सोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्यात आले नसल्याने त्याला करोनाची लागण झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. तशातच जोकोविचचा एका पार्टीतला डान्स व्हायरल झाला आहे.

ऑस्ट्रेलियन टेनिसपटू निक कार्गिओस याने एक व्हिडीओ रिट्विट केला आहे. त्या व्हिडीओमध्ये जोकोविच आणि इतर सहकारी खेळाडू एका पार्टीमध्ये तुफान डान्स करताना दिसत आहेत. या व्हिडीओमध्ये सोशल डिन्स्टन्सिंगचे अजिबात पालन झालेले नसल्याचेही स्पष्ट दिसत आहे. त्या व्हिडीओबाबत मत मांडताना कार्गिओसने लिहिले आहे, “ज्या-ज्या खेळाडूंना करोनाची लागण झाली आहे, ते लवकर तंदुरूस्त व्हावेत हीच प्रार्थना. आतापर्यंत ज्या लोकांनी मला मी केलेल्या काही कृत्यांबद्दल बेजबाबदार किंवा मूर्ख अशी नावं ठेवली, (त्यांच्यासाठी हा व्हिडीओ आहे.) कारण बेजबाबदारपणा आणि मूर्खपणाचा कळस हा या व्हिडीओमध्ये दिसून येत आहे.”

‘त्या’ कृत्याबद्दल जोकोविचने मागितली माफी

“आमच्या आणि आयोजकांच्या कृत्यामुळे स्पर्धेला गालबोट लागले त्यासाठी मी मनापासून माफी मागतो. गेल्या महिन्यात मी आणि कार्यक्रमाच्या आयोजकांनी जे काही केलं, त्यातील आमचा हेतू शुद्ध होता. आरोग्यविषयक सर्व गोष्टींची काळजी घेऊनच स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते कारण त्यातूनच साऱ्यांना पुन्हा एकत्र भेटता येईल असं आमचं मत होतं, पण आम्ही चुकीचे होते. स्पर्धेचे आयोजन करण्यात आमच्याकडून घाई झाली”, अशी कबुली जोकोविचने दिली.

जोकोविचच्या पत्नीलाही करोनाची लागण झाली आहे, मात्र सुदैवाने मुलांचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे.