तीन वर्षांनंतर पुन्हा सलग चौथी ग्रॅँडस्लॅम जिंकण्यास उत्सुक

सलग चार ग्रँडस्लॅम जिंकून दाखवण्याची कामगिरी पुन्हा एकदा करण्यासाठी नोव्हाक जोकोव्हिच उत्सुक असून त्याच्यासमोर राफेल नदाल आणि रॉजर फेडरर यांचेच प्रमुख आव्हान असणार आहे, तर महिलांमध्ये नाओमी ओसाकाच्या कामगिरीवर सर्वाची नजर असेल.

तीन वर्षांपूर्वी जोकोव्हिचने अशी कामगिरी केलेली असल्याने ती किमया पुन्हा साधण्यास तो सज्ज झाला आहे. अशा प्रकारची कामगिरी डॉन बज (१९३८) आणि रॉड लेव्हर (१९६२ आणि १९६९) यांनाच जमली होती. त्यातही लेव्हरप्रमाणे दोन वेळा चारही ग्रँडस्लॅम सलग जिंकण्याची किमया अद्याप कुणालाही दाखवता आलेली नाही. त्यामुळे यंदाची फ्रेंच खुली टेनिस स्पर्धा जिंकून त्या विक्रमाची बरोबरी करण्याच्या निर्धारानेच जोकोव्हिच उतरणार आहे. जोकोव्हिचने २०१८ची विम्बल्डन आणि अमेरिकन खुली टेनिस स्पर्धा तसेच यंदा जानेवारीत झालेली ऑस्ट्रेलियन खुली टेनिस स्पर्धा जिंकली असल्याने त्याला २०१६च्या कामगिरीची पुनरावृत्ती करण्याचे वेध लागले आहेत.

यंदा फ्रेंच खुली टेनिस स्पर्धेत जोकोव्हिचची पहिली लढत पोलंडच्या हुबर्ट हूरकॅझशी होणार असून तो अडथळा पार केल्यास पुढील लढतीत त्याला बहुधा जर्मनीच्या अलेक्झांडर झ्वेरेव्हशी झुंजावे लागणार आहे.

फेडररने त्याच्या कारकीर्दीत आजपर्यंतच्या सर्वाधिक २० तर नदालने १७ ग्रँडस्लॅममध्ये बाजी मारली आहे. जोकोव्हिचच्या १५ ग्रँडस्लॅमच्या तुलनेत ते अधिक आहेत. मात्र त्या दोघांनाही सलग चारही ग्रँडस्लॅममध्ये विजयी कामगिरी करता आलेली नाही. या ऐतिहासिक कामगिरीसाठी जोकोव्हिचला लयीत परतलेला फेडरर आणि तंदुरुस्तीनंतर इटालियन खुल्या टेनिस स्पर्धेचे विजेतेपद पटकावलेला नदाल हेच मुख्य आव्हान ठरण्याची शक्यता आहे. इटालियन खुल्या टेनिस स्पर्धेत नदालकडून पराभूत झालेल्या जोकोव्हिचने फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेतही नदाल हाच विजयाचा दावेदार असल्याचे म्हटले आहे.

सेरेनाबाबत प्रश्नचिन्ह

सेरेना विल्यम्स ही विश्वविक्रमी २४ ग्रँडस्लॅमशी बरोबरी करण्याच्या प्रयत्नात आहे. मात्र, तिच्या तंदुरुस्तीबाबत प्रश्नचिन्ह कायम असल्याने यंदा ती संभाव्य दावेदारांच्या शर्यतीत नाही. सेरेनाची पहिली लढत रशियाच्या व्हिटालिया डियाचेन्कोशी होणार आहे. संभाव्य दावेदार मानल्या जाणाऱ्या जपानच्या नाओमी ओसाकाला पहिल्या लढतीत स्लोव्हाकियाच्या अ‍ॅना कॅरोलिनाशी झुंजावे लागेल, तर सिमोना हॅलेपचा सामना चेक प्रजासत्ताकच्या मार्केटा व्होंडरोऊसोव्हाशी होणार आहे.

  • सामन्यांची वेळ : दु. २.३० वा.
  • थेट प्रक्षेपण: स्टार स्पोर्ट्स सिलेक्ट २