सर्बियाचा अव्वल टेनिसपटू नोव्हाक जोकोव्हिचने शनिवारी मध्यरात्री झालेल्या उपांत्य सामन्यात स्वित्र्झलडच्या अनुभवी रॉजर फेडररला पराभूत करत पॅरिस मास्टर्स टेनिस स्पर्धेची अंतिम फेरी गाठली.

जवळपास तीन तास रंगलेल्या या लढतीत जोकोव्हिचने फेडररवर ७-६ (८-६), ५-७, ७-६ (७-३) असा विजय मिळवला. या विजयाबरोबरच त्याने जागतिक टेनिस क्रमवारीत तिसऱ्या स्थानी असलेल्या फेडररची सलग २२ सामन्यांपासून सुरू असलेली पराभवाची मालिका खंडित केली. अंतिम फेरीत जोकोव्हिचसमोर रशियाच्या कॅरेन खाचानोव्हचे आव्हान असणार आहे. २२ वर्षीय खाचानोव्हने ऑस्ट्रीयाच्या डोमनिक थीमला ६-४, ६-१ अशी सरळ दोन सेटमध्ये धूळ चारून अंतिम फेरीत स्थान मिळवले.

जोकोव्हिच आणि फेडरर यांच्यातील लढतींच्या आकडेवारीत जोकोव्हिच २५-२२ असा आघाडीवर असून २०१५नंतर त्याने फेडररविरुद्ध एकही सामना गमावलेला नाही.

दुखापतीमुळे या स्पर्धेतून मध्यातच माघार घेतलेल्या राफेल नदालला पाठी टाकत जोकोव्हिच सोमवारी जागतिक टेनिस क्रमवारीत अव्वल स्थान पटकावणार आहे. त्याशिवाय अंतिम फेरीत विजेतेपद मिळवल्यास त्याला नदालच्याच कारकीर्दीतील एकूण ३३ मास्टर्स विजेतेपदांशी बरोबरी साधता येईल.