झ्वेरेव्ह, हॅलेप यांचीही तिसऱ्या फेरीत आगेकूच; वॉवरिंका, थीम यांचे आव्हान संपुष्टात

गतवर्षीच्या फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेचा उपविजेता डॉमिनिक थीम व माजी विजेत्या स्टॅनिस्लास वॉवरिंका यांना गुरुवारी ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीतूनच गाशा गुंडाळावा लागला. मात्र नोव्हाक जोकोव्हिच, अ‍ॅलेक्झांडर झ्वेरेव्ह, सेरेना विल्यम्स आणि सिमोना हॅलेप यांनी अपेक्षितरीत्या तिसरी फेरी गाठली.

मेलबर्न एरिना येथे सुरू असलेल्या या स्पर्धेतील पुरुष एकेरीच्या लढतीत ऑस्ट्रियाच्या सातव्या मानांकित थीमला ऑस्ट्रेलियाच्या अ‍ॅलेक्सी पोपरिनने ७-५, ६-४, २-० असे नमवले. पहिले दोन सेट गमावणाऱ्या थीमने तिसऱ्या सेटमध्ये दुखापतीमुळे सामना अर्धवट सोडून पोपरिनला विजय बहाल केला. पोपरिनने कारकीर्दीत प्रथमच या स्पर्धेच्या तिसऱ्या फेरीत स्थान मिळवले आहे. कॅनडाच्या १६व्या मानांकित मिलास राओनिकने २०१४ मध्ये या स्पर्धेचे विजेतेपद मिळवणाऱ्या वॉवरिंकावर ७-६ (७-४), ६-७ (६-८), ६-७ (११-१३), ६-७ (५-७) असा चार सेटमध्ये संघर्षपूर्ण विजय मिळवला. हा सामना तब्बल चार तास व दोन मिनिटे रंगला.

जागतिक टेनिस क्रमवारीत अव्वल स्थानी विराजमान असणाऱ्या प्रथम मानांकित जोकोव्हिचने फ्रान्सच्या जो-विल्फ्रीड त्सोंगाचा ६-३, ७-५, ६-४ असा पराभव केला. या सामन्यादरम्यान जोकोव्हिच काही क्षणांसाठी मैदानावरदेखील कोसळला. मात्र त्याने हार न मानता सामना जिंकला. फोरहँड व कोर्टजवळून फटक्यांचा त्याने सुरेख खेळ केला. फ्रेंच टेनिस स्पर्धेत त्याला गुडघ्याच्या दुखापतीमुळे माघार घ्यावी लागली होती.

जर्मनीच्या चौथ्या मानांकित झ्वेरेव्हने जेरेमी चार्डीवर ३ तास ४६ मिनिटे चाललेल्या सामन्यात ७-६ (७-५), ६-४, ५-७, ६-७ (७-८), ६-१ अशी मात केली, तर जपानच्या केई निशिकोरीने इव्हो कालरेव्हिचवर ६-३, ७-६ (८-६), ५-७, ५-७, ७-६ (१०-७) अशी सरशी साधली.

कारकीर्दीत २३ ग्रँडस्लॅम विजेतेपदे मिळवणाऱ्या १६व्या मानांकित सेरेनाने कॅनडाच्या एगुईन बॉचार्डचा ६-२, ६-२ असा सहज धुव्वा उडवला. रोमानियाच्या प्रथम मानांकित हॅलेपने सोफिया केनिनला ६-३, ६-७ (५-७), ६-४ असे नमवले. गतवर्षीच्या अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेची विजेती चौथी मानांकित नाओमी ओसाकाने तामरा झिडानेस्कवर ६-२, ६-४ असा सहज विजय मिळवत तिसऱ्या फेरीतील स्थान निश्चित केले, तर व्हीनस विल्यम्सने अ‍ॅल्झी कॉर्नेटवर ६-३, ४-६, ६-० अशी मात केली.