ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेत नोव्हाक जोकोव्हिचने फ्रान्सच्या लुकास पावलोवर ६-०, ६-२, ६-२ असा सहज विजय मिळवत अगदी सहजपणे अंतिम फेरी गाठली आहे. त्यामुळे आता राफेल नदाल आणि जोकोव्हिच अशी जेतेपदाची लढत पाहायला मिळणार आहे.

जोकोव्हिचने पहिल्या सेटमध्ये तर पावलोला खातेदेखील उघडू दिले नाही, तर दुसऱ्या आणि तिसऱ्या सेटमध्ये केवळ दोन-दोन गेम जिंकू न देता अत्यंत दिमाखात अंतिम फेरीत प्रवेश केला. २०१२मध्ये याच अंतिम सामन्यात जोकोव्हिचने नदालवर  तब्बल ५ तास ५३ मिनिटांच्या संघर्षांनंतर मात केली होती. यंदा जोकोव्हिचने अंतिम सामना जिंकल्यास रॉजर फेडरर आणि रॉय इमर्सन यांना मागे टाकत सातव्यांदा ऑस्ट्रेलियन टेनिस स्पर्धा जिंकणारा टेनिसपटू बनणार आहे, तर नदालने अंतिम सामना जिंकल्यास तो चारही ग्रँडस्लॅम प्रत्येकी किमान दोन वेळा जिंकणारा पहिलाच खेळाडू ठरेल.

मी ज्याप्रमाणे विचार केला होता, त्यापेक्षाही अधिक दमदार खेळ झाला. त्यामुळे हा सामना माझा या स्पर्धेतील सर्वोत्तम खेळ होता, असे म्हणता येईल.    – नोव्हाक जोकोव्हिच, टेनिसपटू

 

जिद्दी क्विटोव्हाला युवा ओसाकाचे आव्हान

ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेच्या विजेतेपदासाठी शनिवारी चेक प्रजासत्ताकच्या जिद्दी पेट्रा क्विटोव्हासमोर जपानच्या युवा नाओमी ओसाकाचे आव्हान आहे. ग्रँडस्लॅमच्या अंतिम फेरीत प्रथमच पोहोचलेल्या दोघींनाही जेतेपद जिंकण्याची समान संधी असल्याचे मानले जात आहे.

या स्पर्धेचा किताब जिंकून जागतिक क्रमवारीत अव्वल स्थान गाठणे हे दोघींचेही ध्येय राहणार आहे. क्विटोव्हा ही मागील ११ सामन्यांमध्ये अपराजित असून तिने या स्पर्धेत एकही सेट गमावलेला नाही. तसेच कोणताही सेट टायब्रेकपर्यंतदेखील जाऊ दिलेला नाही. २०१६मध्ये एका चोरटय़ाने अनुभवी क्विटोव्हाच्या हातावर हल्ला करून जखमी केले होते. मात्र त्या सगळ्या अडचणींवर जिद्दीने मात करीत क्विटोव्हाने यंदा ऑस्ट्रेलियनच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे.

दुसरीकडे ओसाकाने अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेत नुकतेच सेरेना विल्यम्सला पराभूत करीत विजेतेपद मिळवले होते. त्यानंतर पाठोपाठ असलेल्या ऑस्ट्रेलियनच्या अंतिम फेरीत धडक मारण्याची किमया तिने करून दाखवली आहे.

क्विटोव्हाचे प्रशिक्षक जिरी वॅनेक यांच्या मते दोघीही खूप जलद खेळ करणाऱ्या असल्याने हा सामना अटीतटीचा आणि रोमहर्षक होणार आहे.  या दोघींनीही त्यांच्या कारकीर्दीत कधीही अव्वल स्थान गाठलेले नाही. जागतिक क्रमवारीत ओसाका सध्या चतुर्थ स्थानी तर क्विटोव्हा आठव्या स्थानावर आहे. त्यामुळे या अंतिम फेरीतही ती अमेरिकन स्पर्धेप्रमाणेच विजेतेपद पटकावणार का? याकडे टेनिसप्रेमींचे लक्ष लागले आहे.