कारकीर्दीतील सर्वाधिक २९ जेतेपदांचा विक्रम; अंतिम फेरीत अँडी मरेवर विजय

जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेल्या नोव्हाक जोकोव्हिचने माद्रिद खुल्या टेनिस स्पध्रेच्या अंतिम लढतीत अँडी मरेवर विजय मिळवत कारकीर्दीतील सर्वाधिक २९वे मास्टर्स स्पध्रेचे जेतेपद नावावर केले. दहा वर्षांपूर्वी याच स्पध्रेत जोकोव्हिच आणि मरे यांनी भविष्यातील उदयोन्मुख खेळाडू म्हणून स्वत:ची छाप उमटवली होती. आज हे दोघेही टेनिस विश्वात सर्वोच्च शिखरावर विराजमान झालेले आहेत. जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेल्या जोकोव्हिचने ६-२, ३-६, ६-३ अशा फरकाने दुसऱ्या स्थानावरील मरेला पराभूत केले.

‘दहा वर्षांनंतर आम्ही जगातील दोन सर्वोत्तम खेळाडू बनलो आहोत. त्या वेळी हे यश मिळवणे अधिक आव्हानात्मक आहे, असे आम्हाला वाटले होते,’ अशी प्रतिक्रिया जोकोव्हिचने दिली. २८ वर्षीय जोकोव्हिचने २००६मध्ये माद्रिद खुल्या स्पध्रेत मरेवर तीन सेटमध्ये विजय मिळवला होता. तो पुढे म्हणाला,‘आम्ही दोघांनी कारकीर्दीत सकारात्मक वाटचाल केली आहे. आणि  १२व्या वर्षांपासून आम्ही एकमेकांना ओळखत आहोत. टेनिस विश्वावर विजय मिळवण्याचा आमचा उद्देश त्या वेळेपासूनच आमच्यात तुम्हाला दिसला असेल.’

जोकोव्हिचने अंतिम गेममध्ये पाच ब्रेक पॉइंट वाचवले आणि त्याचे विजयात रूपांतर करून गतविजेत्या मरेचा पराभव केला. या विजयाबरोबर जोकोव्हिचने मास्टर्स टेनिस स्पध्रेतील सर्वाधिक २९ जेतेपद नावावर केले असून २८ जेतेपदांसह राफेल नदाल दुसऱ्या स्थानावर आहे. मरेच्या खात्यात केवळ ११ मास्टर्स जेतेपद आहेत आणि या पराभवामुळे त्याची जागतिक क्रमवारीत तिसऱ्या स्थानावर घसरण होण्याची शक्यता आहे.

गेल्या पंधरा सामन्यात जोकोव्हिचने जागतिक क्रमवारीतील अव्वल दहा स्पर्धकांविरुद्धच्या ३५ पैकी ३३ सेट जिंकले आहेत.

अ‍ॅमेली मॉरेस्मो यांनी मरेचे प्रशिक्षकपद सोडले

गेली दोन वर्ष अँडी मरेचे प्रशिक्षकपद साांभाळणाऱ्या माजी महिला टेनिसपटू अ‍ॅमेली मॉरेस्मो यांनी पद सोडण्याचा निर्णय घेतला आहे. मॉरेस्मो यांच्या मार्गदर्शनाखाली खेळताना मरेने कारकीर्दीत पहिल्यांदाच क्ले कोर्टवर झालेल्या स्पर्धेचे जेतेपद पटकावले. तसेच ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली होती. ‘अँडीला मार्गदर्शन करताना मीही अनेक गोष्टी शिकले. भविष्यात तो आणखी जेतेपदांची कमाई करेल असा विश्वास आहे’, असे मॉरेस्मो यांनी सांगितले.

फेडररची दुसऱ्या स्थानी झेप

माद्रिद खुल्या टेनिस स्पर्धेत उपविजेतेपदावर समाधान मानावे लागलेल्या अँडी मरेला जागतिक क्रमवारीत घसरणीला सामोरे जावे लागले आहे. सतरा ग्रँड स्लॅम जेतेपदे नावावर असलेल्या रॉजर फेडररने दुसरे स्थान पटकावले आहे. मरेला माद्रिद खुल्या टेनिस स्पर्धेचे जेतेपद कायम राखता आले नाही. पाठीच्या दुखापतीमुळे फेडररने माद्रिद स्पर्धेतून माघार घेतली होती. कारकीर्दीतले २९वे जेतेपद पटकावणाऱ्या नोव्हाक जोकोव्हिचने क्रमवारीतले अव्वल स्थान कायम राखले आहे. ऑस्ट्रेलियाच्या निक कुर्यिगासने क्रमवारीत अव्वल वीसमध्ये स्थान पटकावले आहे.

बोपण्णाची घसरण

माद्रिद खुल्या टेनिस स्पर्धेत उपविजेतेपदावर समाधान मानावे लागलेल्या रोहन बोपण्णाची क्रमवारीत घसरण झाली असून, तो आता १३व्या स्थानी आहे. रिओ ऑलिम्पिकसाठी पात्र ठरण्यासाठी बोपण्णाला ६ जूनपर्यंत क्रमवारीत अव्वल दहामध्ये स्थान राखणे आवश्यक आहे. हे स्थान राखल्यास ऑलिम्पिकसाठी सहकारी निवडण्याची मुभा बोपण्णाला मिळू शकते. दरम्यान ब्युसान स्पर्धेचे जेतेपद पटकावणाऱ्या लिएण्डर पेसने तीन स्थानांनी सुधारणा करत ५४वे स्थान गाठले आहे. एकेरी प्रकारात युकी भांब्रीची सात स्थानांनी घसरण होऊन १२९व्या स्थानी स्थिरावला आहे. पुरव राजा १०६व्या स्थानी स्थिर आहे.

१२

जोकोव्हिच आणि मरे यांच्यात २०१४नंतर झालेल्या १३ सामन्यांत जोकोव्हिचने १२ विजय मिळवले आहेत. एकूण कारकीर्दीत जोकोव्हिचचा मरेविरुद्ध जयपराजयाचा आकडा २३-९ असा आहे.

०२

जोकोव्हिचने दुसऱ्यांदा माद्रिद खुल्या टेनिस स्पध्रेत बाजी मारली असून यंदाच्या हंगामातील त्याचे हे पाचवे जेतेपद आहे.

२०११

जोकोव्हिचने २०११मध्ये पहिल्यांदा माद्रिद खुली स्पर्धा जिंकली होती. त्याने ७-५, ६-४ अशा सरळ सेटमध्ये राफेल नदालचा पराभव केला होता.