माद्रिद खुली टेनिस स्पर्धा

अंतिम फेरीत स्टीफानोस त्सित्सिपासवर ६-३, ६-४ अशी मात

जागतिक टेनिस क्रमवारीत अव्वल स्थानी विराजमान असणाऱ्या नोव्हाक जोकोव्हिचने आपल्याला विश्वातील सवरेत्कृष्ट खेळाडू म्हणून का ओळखले जाते, हे पुन्हा एकदा दाखवून दिले. रविवारी रात्री झालेल्या माद्रिद खुल्या टेनिस स्पर्धेच्या अंतिम फेरीत ग्रीकच्या स्टीफानोस त्सित्सिपासवर विजय मिळवून जोकोव्हिचने वर्षांतील दुसऱ्या, तर कारकीर्दीतील तिसऱ्या माद्रिद विजेतेपदाला गवसणी घातली.

जवळपास एक तास व ४० मिनिटे रंगलेल्या या सामन्यात सर्बियाच्या अग्रमानांकित जोकोव्हिचने त्सित्सिपासला ६-३, ६-४ अशी सहज धूळ चारली. शनिवारी रात्री उशिरापर्यंत लांबलेल्या उपांत्य फेरीच्या लढतीत राफेल नदालला पराभूत केल्यानंतर २४ तासांच्या अंतरातच अंतिम सामना खेळावा लागलेल्या त्सित्सिपासच्या थकव्याचा जोकोव्हिचने फायदा उचलला.

जोकोव्हिचने वर्षांच्या सुरुवातीला ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेचे अजिंक्यपद मिळवले होते. त्याशिवाय जोकोव्हिचने राफेल नदालच्या ३३ मास्टर्स विजेतेपदांशी बरोबरी केली असून २६ मेपासून सुरू होणाऱ्या फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेत या दोघांपैकी कोण बाजी मारतो, याकडे चाहत्यांचे लक्ष लागले आहे. त्याबरोबरच गतवर्षी विम्बल्डन, अमेरिकन आणि यंदाचे ऑस्ट्रेलियन अशा सलग तीन ग्रँडस्लॅम विजेतेपदांवर नाव कोरणाऱ्या जोकोव्हिचला यंदा चौथे ग्रँडस्लॅम विजेतेपद पटकावण्याचीही संधी आहे.

ऑस्ट्रेलियन स्पर्धेचे विजेतेपद मिळवल्यानंतर माझी कामगिरी काहीशी ढासळली होती. त्यामुळे हे विजेतेपद मला फ्रेंच स्पर्धेच्या दृष्टीने तयारी करण्यासाठी फार लाभदायक ठरेल.