फ्रान्सने अंतिम आठ संघांमध्ये धडक मारली, परंतु त्याआधी त्यांनी खऱ्या अर्थाने अव्वल संघांचा सामना केलाच नाही. प्राथमिक फेरीत त्यांच्यासमोर स्वित्र्झलड, इक्वेडोर आणि होंडुरासचे आव्हान होते. या तीन संघांपैकी एकाही संघाला फुटबॉलचा मोठा वारसा नाही, कोणत्याही संघाने विश्वचषकात मोठी आगेकूच केलेली नाही. अशा संघांना पार करत फ्रान्सने पहिली फेरी जिंकली. त्यानंतरही त्यांच्यासमोर नायजेरियासारख्या दुबळ्या संघाचे आव्हान होते. त्या मुकाबल्यात सरस खेळ करत त्यांनी दुसरा टप्पा ओलांडला. मात्र तिसऱ्या टप्प्यात त्यांच्यासमोर सर्वसमावेशक खेळासाठी प्रसिद्ध असलेला जर्मनीचा बुरुज उभा ठाकला. त्या बुरुजाला खिंडार पाडणे त्यांना झेपले नाही आणि पराभवासह फ्रान्सला गाशा गुंडाळावा लागला. दुखापतीमुळे फ्रँक रिबरी या फ्रान्सच्या मुख्य खेळाडूला विश्वचषकात सहभागी होता आले नाही. क्लब स्तरावर सातत्यपूर्ण प्रदर्शन करणाऱ्या समीर नासरीला वगळण्याचा निर्णय फ्रान्सच्या प्रशिक्षकांनी घेतला. एकहाती सामना जिंकून देईल असा एकही खेळाडू फ्रान्सच्या ताफ्यात नाही. अपवादात्मक कौशल्य जोपासणारा खेळाडूही त्यांच्याकडे नाही. करिम बेंझेमाने सर्वोत्तम प्रदर्शन करण्याचा प्रयत्न केला. मात्र एकूणच संघ मर्यादित गुणवत्तेचा असल्याने जर्मनीसारख्या मातब्बर संघासमोर त्यांचे आव्हान कमकुवत राहिले. सामन्यापूर्वी आणि सामना सुरू असतानाही जर्मनीच जिंकणार याची चाहत्यांना खात्री होती. यावरूनच फ्रान्सच्या माघारीचे कारण लक्षात यावे. दुसरीकडे जर्मनीने ही लढत जिंकली, मात्र अपेक्षित वर्चस्व त्यांना गाजवता आलेले नाही. प्रत्येक भूमिकेत चोख कामगिरी बजावणारे खेळाडू जर्मनीकडे आहेत. सर्वसमावेशक खेळ हे त्यांचे वैशिष्टय़ आहे, मात्र फ्रान्सविरुद्ध त्यांनी अनेक संधी वाया घालवल्या. आपल्या कामगिरीत कुठे सुधारणा आवश्यक आहे याची स्पष्ट जाणीव जर्मनी संघव्यवस्थापनाला झाली असेल. अत्यंत अभ्यासू प्रशिक्षक म्हणून जोकिम लो ओळखले जातात. जर्मनीच्या वाटचालीतला सगळ्यात खडतर मुकाबला पुढचा असणार आहे. यजमान ब्राझीलला चीतपट करून त्यांना अंतिम फेरी गाठायची आहे.
दुसऱ्या लढतीत ब्राझीलने कोलंबियावर मात केली खरी, मात्र नेयमारला झालेल्या दुखापतीमुळे त्यांचे हे यश झाकोळले गेले. ब्राझीलने पहिल्या सत्रात आक्रमक खेळ केला. मात्र दुसऱ्या सत्रात कोलंबियाच्या धोरणांमुळे त्यांना नमते घ्यावे लागले. ब्राझीलच्या बचावात त्रुटी असल्याचे उघड झाले आहे. मायदेशात विश्वचषक पटकावण्यासाठी ज्याच्यावर आशा केंद्रित झाल्या आहेत, त्या नेयमारलाच दुखापत झाल्याने ब्राझीलकरांना धक्का बसला आहे. आता कोण चषक जिंकून देणार असा सवाल त्यांच्या मनात आहे. मात्र फुटबॉल हा सांघिक खेळ आहे. नेयमार महत्त्वाचा खेळाडू असला तरी ब्राझीलकडे अनेक गुणी खेळाडू आहेत. मात्र जर्मनीसारख्या अव्वल संघासमोर ते सर्वोत्तम प्रदर्शन करू शकतील का, हा प्रश्न आहे. फ्रान्सविरुद्ध जर्मनीला तर कोलंबियाविरुद्ध ब्राझीलला आपापल्या उणिवांची जाणीव झाली आहे. या दोन्ही संघांना एकमेकांविरुद्ध खेळायचे आहे. स्पर्धेतला सगळ्यात उत्कंठावर्धक आणि कौशल्याची कसोटी पाहणारा हा सामना असणार आहे. या सामन्यात होणारी छोटीशी चूक विश्वचषकातील प्रवास संपुष्टात आणू शकतो. त्यामुळे महामुकाबला असेच या लढतीचे वर्णन करावे लागेल. फ्रान्सचा प्रवास संपुष्टात येणे स्वाभाविक होते, मात्र कोलंबियाने आपल्या सर्वागीण खेळाने जगभरातल्या चाहत्यांची मने जिंकून घेतली आहेत. जेम्स रॉड्रिगेझ या युवा खेळाडूने गोल करण्याच्या सातत्यपूर्ण कौशल्याने प्रभावित केले आहे. यंदाच्या विश्वचषकाद्वारे जागतिक व्यासपाठीवर रॉड्रिगेझची प्रतिभा समोर आली असून उगवता तारा होण्याची क्षमता त्याच्यात आहे.