इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतील दुसऱ्या कसोटीला न्यूलँड्स येथे शनिवारपासून प्रारंभ होत असून, दक्षिण आफ्रिकेच्या सल्लागारपदी माजी कर्णधार ग्रॅमी स्मिथची निवड करण्यात आली आहे.

‘‘ग्रॅमी स्मिथ हा एक यशस्वी कर्णधार होता, त्याचबरोबर फलंदाज म्हणूनही त्याने चांगली कामगिरी केली होती. त्यामुळे त्याच्या मार्गदर्शनाचा आम्हाला फायदाच होईल,’’ असे दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार हशिम अमलाने सांगितले.

इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटीत पराभूत झाल्यावर दुसऱ्या सामन्यासाठी संघात दोन बदल करण्यात येणार आहे. वेगवान गोलंदाज डेल स्टेन दुखापतग्रस्त असून त्याच्याजागी वेगवान गोलंदाज कॅगिसो रबाडाला संधी देण्यात येऊ शकते. त्याचबरोबर यष्टीरक्षक क्विंटन डी’ कॉकला वगळण्यात येण्याचीही चिन्हे आहेत. डी’कॉकला वगळल्यास ए बी डी’व्हिलियर्सकडे यष्टीरक्षणाची जबाबदारी सोपवण्यात येणार आहे.