लंडन : कपिलदेव, जवागल श्रीनाथ आणि झहीर खान यांनी प्रदीर्घ काळ भारताच्या वेगवान माऱ्याची धुरा वाहिली. मात्र आता भारताकडे कसोटी क्रिकेटच्या दर्जाचे आठ ते नऊ वेगवान गोलंदाज आहेत, असे मत इशांत शर्माने व्यक्त केले.

वेगवान गोलंदाज इशांतने ८२ कसोटी सामन्यांत २३८ बळी घेतले आहेत. उमेश यादव आणि मोहम्मद शमी यांच्या साथीने तो १ ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या इंग्लंडविरुद्धच्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत भारताच्या वेगवान माऱ्याचे नेतृत्व करील. या मालिकेच्या पाश्र्वभूमीवर इशांत म्हणाला, ‘‘भारतात दर्जेदार वेगवान गोलंदाज घडत नाहीत, असे बरेच जण म्हणतात. पण आता आमच्याकडे कसोटी क्रिकेटच्या दर्जाचे आठ ते नऊ वेगवान गोलंदाज आहेत. त्यामुळेच इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियात मालिका जिंकण्याची क्षमता आता भारताकडे आहे.’’

२०१४च्या इंग्लंड दौऱ्यावरील कसोटी मालिकेतील भारताने जिंकलेल्या एकमेव सामन्यात इशांतचे योगदान महत्त्वाचे होते. लॉर्ड्सवरील त्या विजयात इशांतने दुसऱ्या डावात ७४ धावांत ७ बळी घेतले होते.