दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यात मालिका जिंकणारा भारतीय महिला संघ बलाढय़ ऑस्ट्रेलियाविरुद्ध आत्मविश्वासाने सामोरे जाण्यासाठी उत्सुक झाला आहे. या दोन संघांमधील तीन सामन्यांच्या एकदिवसीय क्रिकेट मालिकेला सोमवारी बडोदा येथे प्रारंभ होत आहे.
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद अजिंक्यपद स्पर्धेचाच भाग म्हणून ही मालिका होत आहे. भारताने या स्पर्धेतील पहिल्या टप्प्यात आफ्रिकेला हरवले आहे.
ऑस्ट्रेलियाची मुख्य मदार कर्णधार मेग लॅनिंग, अष्टपैलू खेळाडू एलिसी पेरी, एलिसी व्हेलानी, निकोली बोल्टन, अश्लिघ गार्डनर व यष्टिरक्षक अॅलिसा हिली यांच्यावर आहे. भारताची भिस्त प्रामुख्याने कर्णधार मिताली राज, उपकर्णधार हरमनप्रीत कौर, स्मृती मानधना, वेदा कृष्णमूर्ती, पूनम राऊत, पूनम यादव, मोना मेश्राम यांच्यावर आहे. द्रुतगती गोलंदाज झुलन गोस्वामी ही दुखापतीमुळे खेळू शकणार नसल्यामुळे भारताच्या गोलंदाजीची जबाबदारी शिखा पांडे व पूजा वस्त्रकार यांच्यावर आहे.
‘‘आफ्रिकेतील विजयामुळे आमच्या खेळाडूंचे मनोधैर्य उंचावले आहे. तरीही ऑस्ट्रेलियाचा संघ बलाढय़ असल्यामुळे आम्ही त्यांच्याविरुद्ध फाजील आत्मविश्वास ठेवणार नाही. झुलनची अनुपस्थिती जाणवणार असली तरीही अन्य गोलंदाजांकडून मला चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे,’’ असे भारताचे प्रशिक्षक तुषार आरोटे यांनी सांगितले.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on March 12, 2018 5:32 am