पत्त्यांमध्ये रमीच्या डावात, रमी लागण्यासाठी जोकर पत्त्याचा वापर केला जातो. एका विशिष्ट पत्त्यासाठी अडलेली रमी सोडवण्यासाठी हा जोकर हमखास कामी येतो. पत्त्यांतले हे सूत्र आता चक्क आयपीएलमध्ये (इंडियन प्रीमिअर लीग) अवतरणार आहे. पुढील वर्षीच्या आयपीएलपूर्वी नव्याने खेळाडूंचा लिलाव होणार असल्याने संघांचा चेहरामोहरा बदलणार आहे. सहा वर्षांच्या कालावधीत विजयाचे हुकमी एक्के असलेल्या खेळाडूंना आपल्याच ताफ्यात कायम राखण्यासाठी ही जोकर कार्ड्सची शक्कल अमलात येणार असल्याचे समजते.
यानुसार एखाद्या फ्रँचाइजीकडे असणाऱ्या खेळाडूसाठी दुसऱ्या फ्रँचाइजीने बोली लावली. मात्र मूळ फ्रँचाइजीला या खेळाडूला सोडायचे नसल्यास ते जोकर कार्ड्सचा वापर करू शकतात, जेणेकरून हा खेळाडू त्यांच्याकडेच राहील. या संभाव्य पद्धतीनुसार लिलावाच्या वेळी प्रत्येक संघाला विशिष्ट जोकर कार्ड्स देण्यात येतील. दुसऱ्या संघाने आपल्या खेळाडूसाठी लावलेली बोली रद्द ठरवण्यासाठी हे जोकर कार्ड कामी येणार आहे. संघाची विजयी घडी बदलू नये यासाठी ही क्लृप्ती योजल्याचे समजते.
समजा, किंग्स इलेव्हन पंजाबने माइक हसीसाठी यशस्वी बोली लावली. माइक हसी याआधीच्या हंगामांमध्ये चेन्नई सुपर किंग्स साठी खेळत होता. जर चेन्नई सुपर किंग्सला हसीला आपल्याच ताफ्याच ठेवायचे असेल तर ते जोकर कार्ड्सचा वापर करतील. मात्र यासाठी त्यांना त्यांच्या खात्यात आवश्यक रक्कम असणे अनिवार्य आहे.
आयपीएलचे नवनियुक्त अध्यक्ष रंजीब बिस्वाल यांची या प्रकरणी प्रतिक्रिया उपलब्ध होऊ शकलेली नाही. मात्र आयपीएल गव्हर्निग काऊंसिल सदस्य तसेच काही फ्रँचाइजींनी जोकर कार्ड्स प्रणालीला दुजोरा दिला. एखादा संघ किती खेळाडूंना संघात कायम ठेवतो यावर त्यांना लिलावात मिळणाऱ्या जोकर कार्ड्सची संख्या ठरणार आहे. प्रत्येक संघाने कायम राखलेले खेळाडू सोडून अन्य खेळाडूंसाठी जोकर कार्ड्स प्रणाली उपलब्ध असणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार एखाद्या संघाने संघात पाच खेळाडूंना कायम राखल्यास त्यांना तीन जोकर कार्ड्स मिळू शकतात. एखाद्या संघाने एकाही खेळाडूला कायम न राखल्यास त्या संघाला पाच जोकर कार्ड्स मिळतील. दरम्यान ही जोकर प्रणाली काही संघांना पसंत नाही. आर्थिकदृष्टय़ा सधन संघांसाठी केलेली ही मेख असल्याचे एका फ्रँचाइजीने सांगितले. सर्वसमावेशक विचार केल्यास, संघात एकाही खेळाडूला कायम राखण्याची संधी न देता जोकर कार्ड्स देणे योग्य ठरेल. सध्याच्या बाजारभावानुसार, संघाचा आताचा चेहरामोहरा तसाच ठेवण्यासाठी ही रचना करण्यात आल्याची चर्चा आहे.
एका शक्यतेचा विचार केल्यास, मुंबई इंडियन्स रोहित शर्मा, हरभजन सिंग, लसिथ मलिंगा, कीरेन पोलार्ड यांना संघात कायम राखू शकते आणि त्यानंतर तीन जोकर कार्ड्सच्या आधारे प्रग्यान ओझा, मिचेल जॉन्सन आणि दिनेश कार्तिक यांना संघात समाविष्ट करून घेऊ शकते. हे शक्य झाल्यास त्यांच्या संघांचा ७० टक्के संरचना मूळ संघासारखीच राहू शकते. आयपीएल गव्हर्निग काऊंसिलच्या नुकत्याच सिंगापूर येथे झालेल्या कार्यशाळेदरम्यान या पद्धतीवर चर्चा झाली असून, लवकरच या बाबतीत अधिकृत घोषणा होण्याची चिन्हे आहेत.