News Flash

आता लक्ष्य ग्रँडमास्टर किताब

आंतरराष्ट्रीय मास्टर किताब मिळाल्यामुळे माझा आत्मविश्वास उंचावला आहे. लवकरात लवकर ग्रँडमास्टर किताब मिळविण्याचे माझे लक्ष्य आहे.

| August 2, 2015 01:51 am

आंतरराष्ट्रीय मास्टर किताब मिळाल्यामुळे माझा आत्मविश्वास उंचावला आहे. लवकरात लवकर ग्रँडमास्टर किताब मिळविण्याचे माझे लक्ष्य आहे. शक्यतो डिसेंबरपूर्वीच या किताबावर मोहोर नोंदविण्याचा माझा प्रयत्न राहील, असे उदयोन्मुख बुद्धिबळपटू अभिमन्यू पुराणिकने सांगितले.
अभिमन्यूने बार्सिलोना येथे नुकत्याच झालेल्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत आंतरराष्ट्रीय मास्टर किताबावर शिक्कामोर्तब केले. हा किताब पूर्ण करण्यासाठी त्याला ७० मानांकन गुणांची आवश्यकता होती. त्याने ९० मानांकन गुण मिळवीत हे ध्येय साकार केले. शनिवारी पुण्यात आगमन झाल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना तो म्हणाला, ‘‘हा किताब मिळविण्यासाठी आवश्यक असलेले गुण मिळविण्याची मला खात्री होती. थोडेसे दडपण होते, मात्र या दडपणामुळेच माझ्यातील आत्मविश्वास वाढला. या किताबासाठी डावांच्या गृहपाठाबरोबरच मानसिक तयारीही केली होती. या किताबाचे श्रेय माझे आई-वडील तसेच प्रशिक्षक जयंत गोखले व सिम्बायोसिस प्रशालेच्या मुख्याध्यापिका लीना चौधरी यांना द्यावे लागेल.’’
स्पेनमधील स्पर्धेचा अनुभव कसा होता असे विचारले असता अभिमन्यू म्हणाला, ‘‘या स्पर्धेत मला अनेक ग्रँडमास्टर व आंतरराष्ट्रीय मास्टर खेळाडूंबरोबर खेळण्याची संधी मिळाली. त्याचा फायदा मला भावी कारकीर्दीसाठी होणार आहे. डावाची सुरुवात, मध्य डावातील व्यूहरचना, शेवटच्या टप्प्यातील महत्त्वाच्या चाली, प्याद्याचे मोहोरात रूपांतर करणे आदी विविध शैलींचा मला अभ्यास करता आला. २६०० मानांकन गुणांचा टप्पा पार करणाऱ्या कोरी जॉर्ज याच्यासह काही खेळाडूंच्या डावांचा मी बारकाईने अभ्यास केला आहे. त्याचा उपयोग मला ग्रँडमास्टर किताब मिळविण्यासाठी निश्चित होणार आहे.’’
अभ्यास व ग्रँडमास्टर किताबाचा सराव याची सांगड कशी घालणार असे विचारले असता तो म्हणाला, ‘‘डिसेंबपर्यंत ग्रँडमास्टर किताबाचे तीनही निकष पूर्ण करण्याचे ध्येय आहे. दोन्ही ध्येये साध्य करताना जास्त मेहनत करावी लागणार आहे, मात्र त्याची तयारी आहे.’’

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 2, 2015 1:51 am

Web Title: now the target grandmaster title
टॅग : Chess
Next Stories
1 विशेष ऑलिम्पिकमध्ये भारताच्या रणवीर सैनीला सुवर्ण
2 व्याप्ती वाढली, गुणवत्तेचे काय?
3 वारंवार प्रशिक्षक बदलांमुळे भारतीय हॉकीचा ऱ्हास –वॉल्श
Just Now!
X