गेल्या दोन वर्षांच्या काळात माझ्या कारकीर्दीत अनेक चढउतार आले. परंतु यामुळेच स्वत:चे अपयश स्वीकारायला शिकलो, अशी कबुली भारताचा युवा फलंदाज संजू सॅमसनने दिली.

महेंद्रसिंह धोनीच्या अनुपस्थितीत ऋषभ पंतसाठी यष्टिरक्षक फलंदाज म्हणून कडवा प्रतिस्पर्धी या नजरेने २५ वर्षीय सॅमसनकडे पाहिले जायचे. परंतु गेल्या पाच वर्षांत त्याच्या वाटय़ाला अवघे पाच ट्वेन्टी-२० सामने आले आहेत. ‘‘मागील दोन वर्षे मला खूप काही शिकवणारी ठरली. विशेषत: या दरम्यान मी माझ्या बलस्थानांवर अधिक लक्ष केंद्रित करायला शिकलो. पूर्वी अपयशाला सामोरे गेल्यास मी फार निराश व्हायचो. परंतु धोनीकडून प्रेरणा घेत मी अपयश मान्य करून स्वत:च्या भावनांवर नियंत्रण राखण्यास शिकलो आहे,’’ असे सॅमसन म्हणाला.

‘‘न्यूझीलंडविरुद्धच्या दौऱ्यात मला संधी लाभल्यामुळे मी फार आनंदीत होतो. एका लढतीत ‘सुपर-ओव्हर’दरम्यानही मला फलंदाजीसाठी पाठवण्यात आले होते. त्यामुळे संघ व्यवस्थापन आणि कर्णधाराचा माझ्यावर विश्वास आहे, हे मला समजले,’’ असेही सॅमसनने सांगितले.