वानखेडे स्टेडियमवर क्रिकेटचा सामना असला की संपूर्ण परिसराचा माहौल क्रिकेटमय होतो. रुपडं पालटून चाहत्यांसमोर सादर झालेल्या प्रो-कबड्डी स्पर्धेने पहिल्या हंगामातच लोकाश्रय मिळवत बाजी मारली. महिनाभरापूर्वी प्रो कबड्डीचा नारळ ज्या वरळीतील एनएससीआयच्या स्टेडियमवर फुटला, तोच परिसर रविवारी कबड्डीमय झाला होता. गणपतीला वंदन करून आणि वरुणराजाच्या भडिमाराची पर्वा न करता दर्दी कबड्डीरसिक सामना सुरू होण्याच्या तीन तास आधीच एनएससीआयच्या प्रांगणात दाखल झाले होते. विशेष म्हणजे या गर्दीत केवळ युवा वर्ग नव्हता तर महिला आणि वरिष्ठ नागरिकांचे प्रमाण लक्षणीय होते. हाऊसफुल्ल गर्दीने संगीताच्या तालावर खेळाडूंचा उत्साह वाढवला.
स्टेडियमध्ये प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी असलेल्या डीजेवर मराठी गाण्यांची चलती होती. ‘कोंबडी पळाली’ आणि ‘बघतोय रिक्षावाला’ गाण्यांना जोरदार प्रतिसाद  पाहायला मिळाला. कुठल्या भाषेतील गाणी ऐकायलाआवडतील या प्रश्नावर मराठी असा जोरदार आवाज घुमला आणि त्यानंतर मराठी गाण्यांच्या तालावर स्टेडियम थिरकू लागले.
कबड्डीत दमसासाची भूमिका महत्त्वाची असते. हाच दमसास आपल्या गाण्यातून जपणाऱ्या शंकर महादेवनच्या ब्रेथलेस गाण्याने कबड्डी मैफलीची सुरमयी सुरुवात झाली. पाटणा पायरेट्स आणि बंगळुरू बुल्स यांच्यातील तिसऱ्या स्थानासाठीच्या लढतीतही खेळाडूंना जोरदार पाठिंबा देणाऱ्या चाहत्यांनी अंतिम लढतीत आवाजी समर्थनासह स्टेडियम दणाणून सोडले.
प्रो कबड्डी स्पर्धेच्या सलामीच्या लढतीच्या वेळी शाहरुख खान, आमिर खान, मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर या त्रिकुटासह मोठय़ा प्रमाणावर बॉलीवूड तारेतारका उपस्थित होते. अंतिम लढतीला सेलिब्रेटींची उपस्थिती तुरळक प्रमाणावर होती मात्र कबड्डीच्या प्रेमापोटी गर्दी केलेल्या सर्वसामान्य रसिकांनीच सेलिब्रेटीजची उणीव जाणवू न देता खेळाडूंचा हुरुप वाढवला.