न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज  आणि कर्णधार टीम साऊदीने आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमध्ये मोठा पराक्रम केला आहे. बांगलादेशविरुद्धच्या तिसऱ्या टी-20 मध्ये साऊदीने 3 बळी घेतले. यासह तो टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक बळी घेणारा दुसरा गोलंदाजही ठरला.

या विक्रमासह साऊदीने पाकिस्तानच्या शाहिद आफ्रिदीला मागे टाकले. आफ्रिदीने आंतरराष्ट्रीय टी-20 सामन्यात 98 बळी घेतले आहेत. टिम साऊदीच्या नावावर आता आंतरराष्ट्रीय टी-20 सामन्यात 99 बळींची नोंद झाली आहे. या विक्रमात श्रीलंकेचा लसिथ मलिंगा अव्वल स्थानी आहे. मलिंगाने 107 बळी घेतले आहेत. साऊदीला मलिंगाचा विक्रमही मोडण्याची संधी आहे.

अफगाणिस्तानच्या राशिद खानने आतापर्यंत आंतरराष्ट्रीय टी-20 सामन्यात 95 विकेट्स घेतल्या आहेत. बांगलादेशच्या शकीब अल हसनने 92 बळी घेतले आहेत. भारताकडून यजुर्वेंद्र चहलने आंतरराष्ट्रीय टी-20 सामन्यात सर्वाधिक विकेट्स घेतल्या आहेत. चहलच्या नावावर 62 बळींची नोंद आहे.

एकूण टी-20 क्रिकेटटमध्ये ब्राव्हो अव्वल

एकूण टी-20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक बळींच्या बाबतीत वेस्ट इंडिजचा ड्वेन ब्राव्हो अव्वल स्थानी आहे. ब्राव्होने आतापर्यंत टी-20 कारकिर्दीत 515 बळी घेतले आहेत. मलिंगाने टी-20 क्रिकेटमध्ये 390 बळी घेतले आहेत. सुनील नरिनने 390 बळी घेतले आहेत.

न्यूझीलंडचा मालिकाविजय

बांगलादेशविरुद्धच्या तिसर्‍या टी-20 सामन्यात न्यूझीलंडने शानदार खेळ केला. पावसाने व्यत्यय आणलेला सामना न्यूझीलंडने 65 धावांनी खिशात घातला. हा सामना पावसामुळे 10-10 षटकांत खेळवण्यात आला. प्रथम फलंदाजी करणाऱ्या न्यूझीलंडने शानदार कामगिरी करत 4 गडी गमावून 141 धावा केल्या. यात फिन एलनने 29 धावा करत जोरदार फटकेबाजी केली. मार्टिन गुप्टिलने 44 धावा केल्या. प्रत्युत्तरात बांगलादेशचा संघ 9.3 षटकांत 76 धावा करुन बाद झाला. टी-20 सामन्यांच्या मालिकेत न्यूझीलंडने 3-0 असा विजय मिळवून मालिका आपल्या नावावर केली.