कर्णधार केन विल्यमसनच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या न्यूझीलंडने दुसऱ्या टी-२० सामन्यात पाकिस्तानचा ९ गडी राखत धुव्वा उडवून मालिकेवर कब्जा केला आहे. ३ टी-२० सामन्यांच्या मालिकेत न्यूझीलंडकडे आता २-० अशी विजयी आघाडी आहे. पाकिस्तानने विजयासाठी दिलेलं १६४ धावांचं आव्हान न्यूझीलंडने टीम सेफर्ट आणि केन विल्यमसन यांच्या नाबाद अर्धशतकी खेळाच्या जोरावर पूर्ण केलं. सेफर्टने ८४ तर विल्यमसनने ५७ धावा केल्या.

नाणेफेक जिंकत पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. टीम साऊदीने आघाडीच्या तिन्ही फलंदाजांना माघारी धाडत पाहुण्या संघाची हालत ३ बाद ३३ अशी केली. मात्र यानंतर अनुभवी मोहम्मद हाफीजने एक बाजू लावून धरत फटकेबाजीला सुरुवात केली. पाकिस्तानच्या इतर फलंदाजांकडून हवीतशी साथ मिळत नसतानाही हाफीजने ५७ चेंडूत १० चौकार आणि ५ षटकारांसह नाबाद ९९ धावा केल्या. एका धावाने त्याचं शतक हुकलं. हाफीजच्या या खेळीच्या जोरावर पाकिस्तानने १६३ असा आव्हानात्मक धावसंख्येचा टप्पा गाठला. न्यूझीलंडकडून टीम साऊदीने ४ तर इश सोधी आणि निशम यांनी १-१ बळी घेतला.

प्रत्युत्तरादाखल मैदानात उतरलेल्या न्यूझीलंडच्या संघानेही चांगली सुरुवात केली. मार्टीन गप्टील आणि टीम सेफर्ट ही जोडी चांगली फटकेबाजी करत होती. फहीम अश्रमफने गप्टीलला माघारी धाडत न्यूझीलंडला पहिला धक्का दिला. यानंतर टीम सेफर्ट आणि विल्यमसनने मैदानात चौकार-षटकारांची आतिषबाजी करत पाकिस्तानच्या हातातून सामना हिसकावून घेतला. नाबाद ८४ धावांच्या खेळीत सेफर्टने ८ चौकार आणि ३ षटकार लगावले. विल्यमसनने नाबाद ५७ धावांच्या खेळीत ८ चौकार आणि एक षटकार लगावला. ४ बळी घेणाऱ्या टीम साऊदीला सामनावीराचा किताब देऊन गौरवण्यात आलं.