कसोटी क्रिकेटमध्ये ज्याप्रमाणे खेळपट्टीआवर टिकून खेळणे आवश्यक असते, त्याप्रमाणे वन-डे आणि टी२० क्रिकेटमध्ये अधिकाधिक धावा करणे आवश्यक असते. त्यामुळे निर्धारित षटकांच्या सामन्यात चौकार आणि षटकारांच्या माध्यमातून धावा जमवण्याकडे फलंदाजांकडे कल असतो. अशीच तुफानी खेळी श्रीलंकेच्या तिसरा परेराने खेळली. त्याने केवळ ७४ चेंडूंमध्ये १४० धावा फटकावल्या. या खेळीत त्याने तब्बल १३ षटकार लगावले आणि दिग्गज क्रिकेटपटू सनथ जयसूर्या याचा विक्रम मोडीत काढला.

जयसूर्याने एका सामन्यात सर्वाधिक ११ षटकार खेचत सर्वाधिक षटकार मारणारा श्रीलंकेचा खेळाडू म्हणून विक्रम केला होता. तो विक्रम थिसारा परेराने मोडीत काढला. न्यूझीलंडविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यात परेराने तब्बल १३ षटकार लगावले.

दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात न्यूझीलंडने श्रीलंकेपुढे ३२० धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना श्रीलंकेचा निम्मा संघ स्वस्तात बाद झाला. त्यानंतर परेराची ही झंझावाती खेळी पाहायला मिळाली. परेराने या खेळीमध्ये फक्त ७४ चेंडूंमध्ये १३ षटकारांच्या मदतीने तब्बल १४० धावांची तुफानी खेळी साकारली. पण परेराच्या या खेळीनंतरही श्रीलंकेला हा सामना जिंकता आला नाही. श्रीलंकेचा डाव २९८ धावांमध्ये संपुष्टात आला आणि न्यूझीलंडने सामना २१ धावांनी जिंकत एकदिवसीय मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली.