फलंदाज आणि गोलंदाज यांच्या भरीव अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर यजमान न्यूझीलंडने वेस्ट इंडिजविरुद्ध हॅमिल्टन कसोटी सामन्यात एक डाव आणि १३४ धावांनी बाजी मारली आहे. पहिल्या डावात २५१ धावांची खेळी करणारा न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसन सामन्याचा मानकरी ठरला.

पहिल्या डावात टॉम लॅथमचं अर्धशतक आणि विल्यमसनच्या द्विशतकी खेळाच्या जोरावर यजमान न्यूझीलंडने धावांचा डोंगर उभा केला. विंडीजच्या गोलंदाजांचा समाचार घेत न्यूझीलंडच्या फलंदाजांनी सामन्यावर आपलं वर्चस्व निर्माण केलं. विल्यमसनने ४१२ चेंडूत ३४ चौकार आणि २ षटकारांसह २५१ धावा केल्या. त्याला लॅथमने ८६ तर अखेरच्या फळीत जेमिन्सनने नाबाद ५१ धावांची खेळी करत चांगली साथ दिली. ७ बाद ५१९ वर न्यूझीलंडने आपला पहिला डाव घोषित केला.

प्रत्युत्तरादाखल पहिल्या डावात विंडीजची सुरुवातच खराब झाली. टीम साऊदी, जेमिन्सन, वॅगनर यांच्या भेदक माऱ्यासमोर विंडीजचे फलंदाज तग धरु शकले नाहीत. सलामीवीर क्रेग ब्रेथवेट, जॉन कँपबेल, ब्लॅकवूड, कर्णधार होल्डर यांनी पहिल्या डावात थोडीफार लढत देण्याचा प्रयत्न केला परंतू त्यांचे प्रयत्नही तोकडेच पडले. १३८ धावांवर पहिला डाव आटोपल्यानंतर न्यूझीलंडने विंडीजला फॉलोऑन दिला.

दुसऱ्या डावातही विंडीजची सुरुवात खराब झाली. ६ बाद ८९ अशी परिस्थिती असताना मधल्या फळीत ब्लॅकवूड आणि जोसेफ यांनी १५५ धावांची भागीदारी करत न्यूझीलंडचा विजय लांबवण्याचा प्रयत्न केला. ब्लॅकवूडने १०४ तर जोसेफने ८६ धावांची खेळी केली. परंतू न्यूझीलंडच्या माऱ्यासमोर ते देखील फारकाळ तग धरु शकले नाहीत. अखेरीस २४७ डावांवर विंडीजचा दुसरा डाव संपवत न्यूझीलंडने सामन्यात बाजी मारली.