रिओ ऑलिम्पिकची पात्रता मिळवण्यासाठी महत्त्वाच्या असलेल्या वर्ल्ड हॉकी लीग उपांत्य फेरीत भारतीय महिला हॉकी संघाला पहिल्याच लढतीत बेल्जियमकडून पराभव लागला. ऑलिम्पिकचे आव्हान कायम राखण्यासाठी भारताला विजयपथावर परतणे आणि त्यात सातत्य राखण्याची आवश्यकता आहे. मंगळवारी भारतासमोर बलाढय़ न्यूझीलंड संघाचे आव्हान असणार आहे.
या सामन्याचे महत्त्व लक्षात घेता भारतीय संघाचे प्रशिक्षक मॅथिआस अहरेन्स यांनी खेळाडूंना काही सूचना केलेल्या आहेत. ते म्हणाले, ‘‘चेंडू ताब्यात मिळवण्यासाठी केलेल्या कठोर प्रयत्नानंतर त्याचे महत्त्व जाणून घेणे आवश्यक आहे. चेंडू ताब्यात ठेवण्याच्या संधी वाढवण्याबरोबर त्याचे गोलमध्ये रूपांतर करणे शिकायला हवे. पहिल्या सामन्यातील पराभव निराशाजनक होता, परंतु न्यूझीलंडविरुद्ध  आम्ही सकारात्मक दृष्टिकोनातून उतरणार आहोत.’’
पहिल्या लढतीत भारतीय खेळाडूंना संधीचे सोने करण्यात अपयश आले होते. त्यावर अहरेन्स म्हणाले, ‘‘खेळाडू त्याहीपेक्षा सर्वोत्तम कामगिरी करू शकतात. त्यांची तंदुरुस्ती पाहता ते प्रतिस्पर्धी संघांना आव्हान देण्यास सक्षम आहेत आणि ते कठोर मेहनतही घेत आहेत. चेंडू अधिक काळ ताब्यात ठेवणे आवश्यक आहे आणि त्याहून अधिक महत्त्वाचे म्हणजे त्याचे रूपांतर गोलमध्ये करता आले पाहिजे.’’
भारताची न्यूझीलंडविरुद्ध खरी कसोटी लागणार आहे. न्यूझीलंडने पहिल्याच सामन्यांत पोलंडचा १२-० असा धुव्वा उडविला होता. नुकत्याच पार पडलेल्या हॉक वेब चषक स्पध्रेतही न्यूझीलंडने भारतावर ४-१ असा दणदणीत विजय मिळवला होता. त्यामुळे या लढतीत त्यांचे पारडे जड आहे.
सामन्याची वेळ : संध्याकाळी ५.३० वाजता
थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १