२०१९ हे वर्ष संपण्यासाठी आता अवघे काही दिवस शिल्लक आहेत. क्रीडा क्षेत्रातही विविध घटनांमुळे हे वर्ष चाहत्यांच्या पसंतीस उतरले. क्रिकेट, हॉकी, फुटबॉल यांसारख्या खेळांत प्रस्थापितांनी वर्चस्व गाजवले, तर नेमबाजी, टेनिस, बॅडमिंटनमध्ये नवे पर्व सुरू झाले. वर्षभरातील भारतीय क्रीडा ताऱ्यांच्या गगनभरारीचा घेतलेला हा वेध –

हॉकी

ऑलिम्पिक पात्रतेची स्वप्नपूर्ती

नोव्हेंबर महिन्यात झालेली ऑलिम्पिक पात्रता स्पर्धेतील अखेरच्या टप्प्यात भारताच्या पुरुष आणि महिला हॉकी संघांनी अनुक्रमे रशिया आणि अमेरिकेला धूळ चारून २०२०च्या टोक्यो ऑलिम्पिकचे स्थान पक्के केले. २०१८मध्ये झालेल्या विश्वचषकात उपांत्यपूर्व फेरीत पराभव पत्करल्यानंतर भारताच्या पुरुष संघाची कामगिरी ढासळली होती. परंतु ग्रॅहम रिड यांची प्रशिक्षकपदी नियुक्ती झाल्यानंतर भारताने नव्याने संघबांधणीला सुरुवात केली.

अ‍ॅथलेटिक्स

हिमाचा ‘पदकधडाका’

१९ वर्षीय हिमा दासने जुलै महिन्यात २० दिवसांच्या आत पाच सुवर्णपदकांचा धडाका केला. परंतु जागतिक अजिंक्यपद स्पर्धेतून तिने दुखापतीमुळे माघार घेतल्याने तिचे ऑलिम्पिक स्थान अद्याप पक्केोलेले नाही. महाराष्ट्राचा स्टीपलचेसपटू अविनाश साबळेने मात्र राष्ट्रीय विक्रमासह ऑलिम्पिकमधील स्थान निश्चित केले आहे.

कुस्ती

राहुल, दीपकची छाप

जागतिक अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेत भारताला एकमेव रौप्यपदक मिळवून देणाऱ्या दीपक पुनियाने कुस्तीपटूंमध्ये लक्षवेधी कामगिरी केली. त्याशिवाय महाराष्ट्राचा राहुल आवारे, बजरंग पुनिया, विनेश फोगट यांनी ऑलिम्पिकचे स्थान पक्के करताना भारताचा तिरंगा डौलाने फडकवला.

बॅडमिंटन

सुवर्ण‘सिंधू’ आणि ‘लक्ष्य’पूर्ती

भारतीय बॅडमिंटनपटूंनी २०१९ या वर्षांवर प्रामुख्याने छाप पाडली. रिओ ऑलिम्पिक रौप्यपदक विजेत्या पी. व्ही. सिंधूने सलग दोन वर्षे उपविजेतेपदावर समाधान मानल्यानंतर ऑगस्ट महिन्यात झालेल्या जागतिक अजिंक्यपद बॅडमिंटन स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारी पहिली भारतीय खेळाडू ठरण्याचा मान मिळवला. या स्पर्धेनंतर सिंधूची कामगिरी मात्र सातत्याने ढासळली. सिंधूव्यतिरिक्त उदयोन्मुख बॅडमिंटनपटू लक्ष्य सेनने वर्षभरात पाच विजेतेपदे मिळवून स्वत:च्या नावाची दखल विश्वाला घेण्यास भाग पाडले. अपंगांच्या जागतिक स्पर्धेत मुंबईच्या मानसी जोशीनेही ‘सुवर्णकिमया’ साधली.

क्रिकेट

रोहितचा रुद्रावतार

भारतीय क्रिकेट चाहत्यांना २०१९ हे वर्ष रोहितचे वर्ष म्हणून नक्कीच स्मरणात राहील. इंग्लंडमध्ये झालेल्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत रोहितने पाच शतके झळकावण्याचा पराक्रम केला. विश्वचषकाच्या उपांत्य सामन्यात भारताला न्यूझीलंडकडून निसटता पराभव पत्करावा लागल्याने खेळाडूंसह असंख्य चाहत्यांचा हिरमोड झाला. परंतु रोहितने मात्र एकदिवसीय सामन्यांतील शतकांची मालिका कसोटीतही कायम राखली. कसोटी कारकीर्दीत प्रथमच सलामीला उतरताना त्याने दोन्ही डावांत शतके झळकावली. कर्णधार कोहलीनेसुद्धा तिन्ही प्रकारातील वर्चस्व कायम राखले. कोहलीच्या नेतृत्वाखाली भारताने जानेवारीत प्रथमच ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच भूमीत कसोटी मालिकेत नामोहरम केले. त्याशिवाय वर्षभरात वेस्ट इंडिज, दक्षिण आफ्रिका, बांगलादेश यांच्याविरुद्धच्या सर्वच मालिका जिंकून दबदबा निर्माण केला. यंदाच्या वर्षांत भारताला फक्त ऑस्ट्रेलियाविरुद्ध मायदेशात झालेली एकदिवसीय मालिका गमवावी लागली. मात्र वर्षांच्या शेवटी महेंद्रसिंह धोनीच्या भवितव्याबाबत चाहत्यांमध्ये उत्सुकता कायम आहे.

त्याशिवाय २२ नोव्हेंबर हा दिवस भारतीय क्रिकेटच्या इतिहासात ‘गुलाबी’ अक्षरांनी लिहिला गेला. क्रिकेटच्या इतिहासात प्रथमच भारताने गुलाबी चेंडूने प्रकाशझोतात कसोटी सामना खेळला. ऑक्टोबर महिन्यात भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या अध्यक्षपदी नियुक्ती झालेल्या सौरव गांगुलीचा या परिवर्तनामध्ये सिंहाचा वाटा होता.

फुटबॉल

भारत अपयशी, छेत्रीची मेसीवर सरशी

२०२२च्या कतार विश्वचषक फुटबॉल स्पर्धेला पात्र ठरण्यात भारताचा फुटबॉल संघ अपयशी ठरला. पात्रता फेरीत भारताने आशियाई विजेत्या कतारला बरोबरीत रोखले. परंतु ओमानविरुद्धचा पराभव आणि बांगलादेशविरुद्धची बरोबरी भारताला महागात पडली. मात्र कर्णधार सुनील छेत्रीने सर्वाधिक गोल करणाऱ्यांच्या यादीत अर्जेटिनाच्या लिओनेल मेसीला मागे टाकून भारतीय चाहत्यांच्या दु:खावर फुंकर घातली.

बॉक्सिंग

मेरीला सप्तसुवर्णाची हुलकावणी

सहा वेळच्या सुवर्णपदक विजेत्या मेरी कोमला यंदा जागतिक सुवर्णपदकाने हुलकावणी दिली. मात्र तिच्या कामगिरीपेक्षा निखत झरीनशी सुरू असलेल्या वादांमुळे हे वर्ष चाहत्यांना अधिक लक्षात राहील. वर्षअखेरीस मेरीने निवड चाचणीत तिला अस्मान दाखवले. अमित पांघलने भारताकडून सर्वोत्तम कामगिरी करताना रौप्यपदक मिळवले. भारतीय बॉक्सर्ससाठी हे वर्ष एकंदर संमिश्र स्वरूपाचे ठरले.

नेमबाजी

युवकांची भरारी

भारताच्या एकूण २८ खेळाडूंनी ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेतील प्रवेश निश्चित केला असून, यात सर्वाधिक १५ नेमबाजांचा समावेश आहे. विशेषत: मनू भाकर, सौरभ चौधरी यांनी जवळपास प्रत्येक विश्वचषकात पदकांची लूट केली. महाराष्ट्राच्या तेजस्विनी सावंत, राही सरनोबत यांनीही चमकदार कामगिरी केली.

टेनिस

डेव्हिस चषकावर वर्चस्व

लिएण्डर पेससारख्या अनुभवी खेळाडूचा समावेश असलेल्या भारतीय संघाने डेव्हिस चषक टेनिस स्पर्धेत पाकिस्तानला सहज धूळ चारली. काही दिवसांपूर्वीच ४६ वर्षीय पेसने आगामी वर्षांत आपण निवृत्ती पत्करणार असल्याचे जाहीर केले. अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेत भारताच्या सुमित नागलने स्वित्र्झलडच्या रॉजर फेडररला दिलेली कडवी झुंज कौतुकास पात्र ठरली.

लक्षवेधी

* मृत्यू : रमाकांत आचरेकर, माधव आपटे, व्ही. बी. चंद्रशेखर

* निवृत्त : युवराज सिंग

* पुनरागमन : सानिया मिर्झा

* निलंबन : क्रिकेट – हार्दिक पंडय़ा, लोकेश राहुल, पृथ्वी शॉ; अ‍ॅथलेटिक्स – संजीवनी राऊत; बास्केटबॉल – सतनाम सिंग; बॉक्सिंग – सुमित सांगवान; वेटलिफ्टिंग – सीमा

* हॅट्ट्रिक : मोहम्मद शमी, जसप्रीत बुमरा, दीपक चहर, कुलदीप यादव

‘सॅफ’मधील भारताची वर्चस्वमालिका कायम

काठमांडू (नेपाळ) येथे झालेल्या दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताने सलग १३व्यांदा अग्रस्थान पटकावले. १७४ सुवर्ण, ९३ रौप्य आणि ४५ कांस्यपदकांसह भारताने एकूण ३१२ पचकांची कमाई केली. जलतरणामध्ये भारताने सर्वाधिक २७ सुवर्णपदके मिळवली, तर नेमबाजांनी १८ सुवर्णपदकांचा वेध घेतला. खो-खो, कबड्डी यांसारख्या देशी खेळांमध्येही भारताने अपराजित्व कायम राखले.

( संकलन : ऋषिकेश बामणे  मांडणी-सजावट : निलेश कदम)