कर्णधार सुभ्रांशू सेनापतीच्या नाबाद शतकामुळे ओदिशा विजयी

बडोदा : कर्णधार सुभ्रांशू सेनापतीच्या नाबाद शतकी खेळीच्या बळावर ओदिशाने विजय हजारे करंडक एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेत महाराष्ट्रावर पाच चेंडू आणि तीन गडी राखून रोमहर्षक विजय मिळवला.

महाराष्ट्राने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेताना ५० षटकांत ८ बाद २५९ धावा केल्या. राहुल त्रिपाठी (६९) आणि केदार जाधव (६२) यांनी तिसऱ्या गडय़ासाठी ९८ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी केली. ओदिशाच्या सूर्यकांत प्रधानने ५० धावांत तीन बळी घेतले.

मग ओदिशाच्या डावात तिसऱ्या क्रमांकावर उतरलेल्या सेनापतीने १३० चेंडूंत आठ चौकार आणि दोन षटकारांसह नाबाद ११९ धावांची खेळी साकारून संघाला अनपेक्षित विजय मिळवून दिला. आता महाराष्ट्राच्या खात्यावर ८ गुण जमा आहेत.

संक्षिप्त धावफलक

महाराष्ट्र : ५० षटकांत ८ बाद २५९ (राहुल त्रिपाठी ६९, केदार जाधव ६२; सूर्यकांत प्रधान ३/५०) पराभूत वि. ओदिशा : ४९.१ षटकांत ७ बाद २६० (सुभ्रांशू सेनापती ११९; अझिम काझी २/४५)