ऑलिम्पिक तयारीसाठी आपल्याला आलिशान बीएमडब्ल्यू कार विकावी लागणार आहे, असे वक्तव्य भारताची अव्वल धावपटू द्युती चंद हिने केले होते; पण २०१५पासून द्युतीला चार कोटी, नऊ लाख रुपये अर्थसाहाय्य करण्यात आले आहे, असा खुलासा ओडिसा सरकारने करत द्युतीच्या वक्तव्यावर नाराजी व्यक्त केली आहे.

कौटुंबिक जबाबदाऱ्या आणि ऑलिम्पिकच्या तयारीसाठी माझ्यावर आलिशान गाडी विकण्याची वेळ आली आहे, असे काही दिवसांपूर्वी द्युतीने म्हटले होते. मात्र देखभाल खर्च परवडत नसल्यामुळे आपल्याला ही गाडी विकावी लागणार आहे, असे घूमजाव द्युतीने केले होते.

द्युतीवर ओडिसा सरकारने २०१५ पासून चार कोटी रुपये खर्च केले आहेत. टोक्यो ऑलिम्पिकच्या तयारीसाठी दोन हप्त्यांमध्ये तिला ५० लाख रुपये देण्यात आल्याचे ओडिसा सरकारकडून सांगण्यात आले.

‘‘मला पाठिंबा दिल्याबद्दल मी राज्य सरकारची ऋणी आहे; पण मला चार कोटी रुपये मिळालेले नाहीत. त्यामुळे मी इतके पैसे खर्च केले, असेच प्रत्येकाला वाटेल,’’ असे स्पष्टीकरण द्युतीने दिले आहे.