फ्रान्स, जर्मनी आणि पोर्तुगालचा बाद फेरीत प्रवेश

युरो चषक फुटबॉल स्पर्धेत साखळी टप्प्यातील शेवटच्या सामन्यात थरारक खेळाची अनुभूती चाहत्यांना घेता आली. ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या दोन गोलमुळे पोर्तुगालने जगज्जेत्या फ्रान्सला २-२ असे बरोबरीत रोखले. जर्मनीला हंगेरीविरुद्ध बरोबरी पत्करावी लागली तरी ‘फ’ गटातून फ्रान्स, जर्मनी आणि पोर्तुगालने बाद फेरीत प्रवेश केला.

रोनाल्डोने १०९वा गोल करत सर्वाधिक गोल करणाऱ्या इराणच्या अली डेई यांच्या विक्रमाशी बरोबरी साधली. युरो चषकाच्या पाच पर्वांमध्ये खेळताना रोनाल्डोने १४ गोल साकारले आहेत. फ्रान्सच्या मायकेल प्लॅटिनी (९ गोल) यांच्यापेक्षा त्याने पाच अधिक गोल केले आहेत. रोनाल्डोने यंदाच्या साखळी फेरीत तब्बल पाच गोल लगावले आहेत.

रोनाल्डोने २००४मध्ये पहिल्यांदा युरो चषकात पोर्तुगालचे प्रतिनिधित्व करताना ग्रीसविरुद्ध पहिला गोल झळकावला होता. ‘शरियर’ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या डेई यांनी १९९३ ते २००६ दरम्यान इराणकडून खेळताना १०९ गोल झळकावले होते. हा विक्रम कुणीही मोडीत काढणार नाही, असे फुटबॉलपंडितांना वाटत होते.

रोनाल्डोच्या दोन गोलमुळे पोर्तुगालने ‘फ’ गटातील फ्रान्सविरुद्धचा अखेरचा सामना २-२ असा बरोबरीत सोडवला. रोनाल्डोने ३०व्या मिनिटाला पेनल्टीवर गोल केल्यानंतर करीम बेंझेमाने ४५व्या आणि ४७व्या मिनिटाला गोल करत फ्रान्सला २-१ असे आघाडीवर आणले होते. पण रोनाल्डोने ६०व्या मिनिटाला पेनल्टीवर दुसरा गोल करत पोर्तुगालला बरोबरी साधून दिली.

फ गटातील दुसऱ्या सामन्यात बलाढ्य जर्मनीला हंगेरीविरुद्ध २-२ अशी बरोबरी पत्करावी लागली. अ‍ॅडम झालायच्या गोलमुळे हंगेरीने ११व्या मिनिटालाच आघाडी घेतल्यानंतर जर्मनी संघ दबावाखाली होता. अखेर काय हॅवर्ट्झने ६६व्या मिनिटाला जर्मनीला बरोबरी साधून दिली. पण त्यांना हा आनंद फार काळ टिकवता आला नाही. दोन मिनिटांनी आंद्रास शाफेर याने हंगेरीला पुन्हा एकदा आघाडीवर आणले. लेऑन गोरेत्झ्का जर्मनीच्या मदतीला धावून आला. त्याने ८४व्या मिनिटाला केलेला गोल सामन्यात बरोबरी साधणारा ठरला.

‘फ’ गटातील दोन्ही सामने बरोबरीत सुटले असले तरी फ्रान्सने पाच गुणांसह पहिले स्थान पटकावले. जर्मनीने गोलफरकाच्या आधारावर चार गुणांसह दुसरे स्थान प्राप्त केले. पोर्तुगालला चार गुणांनिशी तिसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. या तिन्ही संघांनी बाद फेरीतील आपले स्थान निश्चित केले. आता उपउपांत्यपूर्व फेरीत फ्रान्सची लढत स्वित्झर्लंडशी, जर्मनीची इंग्लंडशी आणि पोर्तुगालची बेल्जियमशी होणार आहे.

स्वयंगोलचे अष्टक

यंदाच्या युरो चषकात भन्नाट वेगाने स्वयंगोल होत आहेत. आतापर्यंत तब्बल आठ स्वयंगोल झाले असून २०१६च्या युरो चषकात फक्त तीन स्वयंगोल नोंदवले गेले होते. १९७६च्या युरो चषकात सर्वाधिक नऊ स्वयंगोल झाले होते, हा विक्रम यंदा मोडीत निघण्याची शक्यता आहे. बुधवारी स्पेनविरुद्धच्या सामन्यात स्लोव्हाकियाने दोन स्वयंगोल लगावले होते. जर्मनीविरुद्धच्या सामन्यातही रुबेन डायस आणि राफेल गुरेरो या पोर्तुगालच्या खेळाडूंनी स्वयंगोल केले होते.

युरो चषकात ‘डेल्टा’चा धोका

डेन्मार्क आणि बेल्जियम यांच्यात १७ जून रोजी झालेल्या युरो चषकातील सामन्यात तीन जणांना करोनाची लागण झाली असून त्यांना ‘डेल्टा’चा संसर्ग झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे या सामन्याला हजेरी लावणाºया चाहत्यांनी करोना चाचणी करवून घ्यावी, अशी विनंती डेन्मार्कच्या आरोग्य विभागाने केली आहे. करोनाबाधितांच्या शेजारी जवळपास ४ हजार जण बसले होते, असे डेन्मार्कचे आरोग्यमंत्री मॅग्नस हेनिके म्हणाले.