कसोटी क्रिकेटमध्ये आक्रमक फलंदाजीने लक्ष वेधणारा सलामीवीर मयंक अगरवालसाठी मर्यादित षटकांच्या भारतीय संघाचे दरवाजेसुद्धा खुले होण्याची चिन्हे आहेत. पुढील महिन्यात होणाऱ्या वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेसाठी मयंकच्या निवडीची दाट शक्यता आहे.

डिसेंबर महिन्यात होणाऱ्या वेस्ट इंडिजविरुद्धच्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेसाठी उपकर्णधार रोहित शर्माला विश्रांती दिली जाण्याची शक्यता आहे. कारण वेस्ट इंडिजविरुद्धचे दोन कसोटी सामने वगळता रोहित सर्वच सामन्यांत खेळत आहे. पुढील वर्षांच्या सुरुवातीला न्यूझीलंड दौऱ्याचे आव्हान पेलताना रोहित तंदुरुस्ती महत्त्वाची असेल. या दौऱ्यात पाच ट्वेन्टी-२०, तीन एकदिवसीय आणि दोन कसोटी सामन्यांच्या मालिका होणार आहेत.

या पार्श्वभूमीवर सलामीच्या स्थानासाठी मयंकच्या पर्यायाचा गांभीर्याने विचार सुरू आहे. ‘अ’ श्रेणीच्या क्रिकेटमध्ये मयंकच्या खात्यावर १३ शतके जमा असून, ५०हून अधिक सरासरी आणि १००हून अधिक स्ट्राइक रेट त्याने राखला आहे.

सलामीवीर शिखर धवन धावांसाठी झगडत असताना लोकेश राहुलसह आणखी एक सलामीचा पर्याय म्हणूनसुद्धा मयंकला संधी मिळू शकते. विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या उत्तरार्धात विजय शंकरला दुखापत झाल्यानंतर बदली खेळाडू म्हणून मयंकला इंग्लंडमध्ये पाठवण्यात आले होते. २०२३मध्ये भारतात होणाऱ्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेपर्यंत धवन संघातील स्थान टिकवू न शकल्यास मयंक सलामीवीराची भूमिका उत्तम पार पाडू शकेल, असे जाणकारांचे म्हणणे आहे.

आतापर्यंत १० कसोटी सामनेसुद्धा न खेळलेल्या मयंकच्या खात्यावर दोन द्विशतके जमा आहेत. बांगलादेशविरुद्ध इंदूर झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात त्याने २४३ धावांची खेळी साकारताना मारलेले आठ उत्तुंग षटकार लक्षवेधी ठरले. त्यामुळेच पुढील वर्षी होणाऱ्या ट्वेन्टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर त्याचा ट्वेन्टी-२० संघातसुद्धा विचार झाल्यास आश्चर्य वाटू नये.

भारतीय संघ व्यवस्थापन मर्यादित षटकांच्या क्रिकेटसाठी मयंकच्या पर्यायाचा विचार करीत असल्यास हे योग्य पाऊल ठरेल. खरे तर मयंक हा मर्यादित षटकांचाच फलंदाज आहे. परंतु कसोटी क्रिकेटच्या गरजेनुसार त्याने स्वत:मध्ये योग्य बदल केले आहेत.

– दीप दासगुप्ता, भारताचे माजी क्रिकेटपटू