पंतप्रधानांचे ‘ईसीबी’ला फेरविचाराचे निर्देश

एपी, लंडन

अवघ्या सहा दिवसांपूर्वी इंग्लंडच्या कसोटी संघातून पदार्पण करणारा उंचपुरा वेगवान गोलंदाज ऑली रॉबिन्सनला सोमवारी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निलंबित करण्यात आले. जवळपास सात ते आठ वर्षांपूर्वी रॉबिन्सनने वर्णभेदात्मक आणि अश्लील ‘ट्वीट’ केल्याचे उघडकीस आल्याने इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट मंडळाने (ईसीबी) त्याच्यावर ही कारवाई केली आहे.

२७ वर्षीय रॉबिन्सनने न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या कसोटीत इंग्लंडसाठी सर्वाधिक सात बळी मिळवले. त्याशिवाय फलंदाजीतही पहिल्या डावात त्याने ४२ धावांचे योगदान दिले. बुधवारी सामन्याच्या पहिल्या दिवशी रॉबिन्सनने २०१२मध्ये केलेल्या ‘ट्वीट’ची छायाचित्रे समाजमाध्यमांवर पसरली. त्या दिवसाचा खेळ संपल्यावर रॉबिन्सनने सदर प्रकरणाविषयी माफीही मागितली. मात्र अधिक तपास केल्यानंतर ‘ईसीबी’ने रॉबिन्सनवर वर्णद्वेषी टिपण्णीचा आरोप लावत त्याला इंग्लंड संघातून बाहेर केले.

‘‘नऊ वर्षांपूर्वी केलेल्या ‘ट्वीट’मुळे कारकीर्दीच्या सुरुवातीलाच मला अशी शिक्षा भोगावी लागेल, याची कल्पनाही केली नव्हती. माझ्या कृत्याबद्दल मला पश्चात्ताप होतो आहे. मी कोणत्याही जाती-धर्माच्या विरोधात नसून माझ्यामुळे ज्यांच्या भावना दुखावल्या असतील, त्यांची मी क्षमा मागतो,’’ असे रॉबिन्सन म्हणाला.

दरम्यान, इंग्लंडचा कर्णधार जो रूटसह सर्व खेळाडूंनी रॉबिन्सनची पाठराखण केली आहे. त्याशिवाय इंग्लंडचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन आणि क्रीडा सचिव ऑलिव्हर डॉडेन यांनीही सदर प्रकरणाबाबत रॉबिन्सनवरील कारवाईबाबत ‘ईसीबी’ला फेरविचार करण्याचे सुचवले आहे.