टवाळखोरांच्या कचाट्यातून महिलेची सुटका करण्यासाठी नेहमी पुरूषांनाच धाडस दाखवावे लागते असे नाही. एखादी स्त्री देखील धाडस दाखवून टवाळखोरांना चांगलीच अद्दल घडवू शकते. ऑलिम्पिकमध्ये थाळी फेकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणाऱया कृष्णा पुनिया हिने नुकतेच दोन तरुणींची टवाळखोरांच्या तावडीतून सुटका केली. राजस्थानच्या चुरू येथील रेल्वे फाटकाजवळ पुनिया आपल्या कारमध्ये असताना तेथे तीन मोटारसायकलस्वार दोन तरुणींना त्रास देत असल्याचे तिने पाहिले. पुनिया त्वरित आपल्या कारमधून खाली उतरली आणि टवाळखोरांच्या दिशेने धावत केली. पीळदार शरीरयष्टीची एक महिला आपल्या दिशेने चालत येत असल्याचे पाहून टवाळखोरांना तेथून पळ काढण्यास सुरूवात केली. पुनियाने टवाळखोरांचा पाठलाग करून त्यातील एकाला पकडण्यात तिला यश आले.

 

पुनियाने लंफगेखोराला थेट पोलीस ठाण्यात नेले. पोलीस ठाण्याबाहेर तोपर्यंत बरीच गर्दी देखील झाली होती. महिलांच्या सुरक्षेबाबतच्या त्रृटींवर यावेळी पुनियाने नाराजी व्यक्त केली. एका इंग्रजी वृत्तपत्राशी बोलताना महिलांच्या सुरक्षेबाबत निष्काळजीपणा बाळगणाऱया स्थानिक पोलिसांच्या निष्काळजीपणावर पुनियाने टीका केली. घडलेल्या प्रसंगापासून पोलीस ठाणे अवघ्या दोन मिनिटांच्या अंतरावर होते. तरीही पोलिसांना घटनास्थळी येण्यात बराच वेळ गेला. मला त्यांना दोन वेळा फोन करावा लागला. पोलीसच जर संकटकाळात असे उशीरा दखल घेणार असतील तर महिला सुरक्षित कशा असतील, असे पुनिया म्हणाली.