माजी ऑलिम्पियनपटू गुरबक्स सिंग ग्रेवाल आणि जोकिम काव्‍‌र्हालो यांनी मुंबई हॉकी असोसिएशनच्या (एमएचए) १२ ऑगस्टला होणाऱ्या निवडणुकीत उडी मारली आहे. ‘‘गुरबक्स सिंग यांनी अध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज भरला असून, त्यांच्यासमोर मावळते अध्यक्ष मंगा सिंग बक्षी यांचे आव्हान आहे. काव्‍‌र्हालो यांनी सचिवपदासाठी अर्ज दाखल केला आहे,’’ अशी माहिती एमएचएचे सचिव राम सिंग राठोड यांनी दिली.
गुरबक्स आणि जोकिम यांच्याव्यतिरिक्त १९८०च्या ऑलिम्पिकमधील सुवर्णपदक विजेत्या संघातील खेळाडू मेर्विन फर्नाडिस यांनीही उपाध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज भरला आहे. याशिवाय गॅव्हीन फेरेरा, राजा भागडे आणि रमेश पिल्ले यांनीही निवडणुकीत उडी मारली आहे. ८ ऑगस्ट रोजी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख आहे.  विद्यमान पदाधिकाऱ्यांनी मुंबईच्या हॉकीला उतरती कळा आणल्याचा आरोप करत या खेळाडूंनी निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, विद्यमान सचिव राठोड यांनी या आरोपांचे खंडन केले आहे. ते म्हणाले, ‘‘ज्या खेळाडूंनी मैदानाचे भाडेकरार संपविण्यासाठी राज्य सरकारकडे धाव घेतली होती, तेच विकासाच्या बाता करत आहेत. मैदानाशिवाय हॉकीचा विकास कसा होऊ शकतो,’’ असा सवाल राठोड यांनी केला.