12 July 2020

News Flash

भारतीय नेमबाजांची इतरांना धास्ती!

युवा खेळाडूंकडून अंजली भागवतला पदकांच्या अधिक अपेक्षा

युवा खेळाडूंकडून अंजली भागवतला पदकांच्या अधिक अपेक्षा

‘‘राष्ट्रकुल स्पर्धेत सहभागी होणाऱ्या नेमबाजीच्या संघात अनुभवी व युवा खेळाडूंचा उत्तम समतोल साधण्यात आला आहे. नुकत्याच झालेल्या स्पर्धामध्ये युवा खेळाडूंच्या कामगिरीकडे लक्ष वेधल्यास गोल्ड कोस्टमध्ये त्यांच्याकडून अधिक पदकांची अपेक्षा आहे. या स्पर्धामध्ये त्यांनी सिंगापूर, ऑस्ट्रेलिया, गेट्र ब्रिटनमधील मातबर खेळाडूंवर विजय मिळवला आहे. त्यामुळे राष्ट्रकुल स्पर्धेत भारतीय नेमबाजांची धास्ती प्रतिस्पर्ध्यांनी घेतली आहे,’’ असे मत भारताची माजी नेमबाज अंजली भागवतने व्यक्त केले.

सोनी पिक्चर नेटवर्कच्या ‘रंग दे तिरंगा’ या अभियानांतर्गत मुंबई क्रीडा पत्रकार संघटनेतर्फे (एसजेएएम) प्रेस क्लब येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमात ती बोलत होती. या वेळी माजी हॉकीपटू विरेन रस्कीन्हा आणि माजी बॅडमिंटनपटू अपर्णा पोपट हेही उपस्थित होते. त्यांनी राष्ट्रकुल स्पर्धेत सहभागी झालेल्या भारतीय खेळाडूंना शुभेच्छा दिल्या.

युवा नेमबाजांमुळे अनुभवी खेळाडूंना बरेच साहाय्य मिळेल, याविषयी अंजली म्हणाली, ‘‘हे सर्व नव्या दमाचे खेळाडू आहेत. येथे अनुभवी खेळाडूंवर पदक जिंकण्याचे दडपण असेल, तर युवकांकडे गमावण्यासारखे काहीच नाही. त्यांना फक्त ऑस्ट्रेलियात जाऊन सर्वोत्तम खेळ करायचा आहे. जे मागील स्पर्धामध्ये ते सातत्याने करत आहेत. युवकांच्या या बिनधास्त खेळाचा अप्रत्यक्षरीत्या अनुभवी खेळाडूंना सांघिक कामगिरीसाठी फायदा होणार आहे. रिओ ऑलिम्पिक स्पर्धेपूर्वी नेमबाजांचा जो गोंधळ उडालेला तसा या स्पर्धेपूर्वी उडालेला नाही. सर्व काही ठरल्याप्रमाणे होत आहे. खेळाडूंना पुरेसा सराव करण्याची संधी मिळाली आहे. त्यामुळे राष्ट्रकुल स्पर्धेत नेमबाज अधिक पदक जिंकतील आणि त्याची धास्ती अन्य देशांनी घेतली आहे.’’

पदरेशी खेळाडूंबरोबर जुळवणे कठीण

‘‘कोणत्याही वैयक्तिक खेळात मानसिक स्थर्य महत्त्वाचे आहे. परदेशी प्रशिक्षकांसोबत ते स्थर्य राखणे भारतीय खेळाडूंना शक्य होत नाही. कारण परदेशी प्रशिक्षकांकडे सर्व काही परिपूर्ण असू शकते. भारतात खेळाडूंना पायाभूत सुविधापासून ते क्रीडा साहित्यापर्यंत संघर्ष करावा लागतो. त्यामुळे परदेशी प्रशिक्षकांच्या मागण्या पूर्ण होऊ शकत नाही आणि त्याचा परिणाम प्रशिक्षण प्रक्रियेवर होतो. याउलट स्थानिक प्रशिक्षकांना या सर्व अडचणींची जाण असते आणि त्यातून मार्ग कसा काढावा, हेही त्यांना जमते. त्यामुळे ते खेळाडूंना समजून घेत योग्य प्रशिक्षण करू शकतात,’’ असे मत अंजलीने व्यक्त केले.

ओल्टमन्स एक चतुर प्रशिक्षक -विरेन रस्कीन्हा

राष्ट्रकुल स्पर्धेत ऑस्ट्रेलियाचा पुरुष हॉकी संघ जेतेपदाचा प्रबळ दावेदार आहे. मात्र रौप्य आणि कांस्यपदकासाठी भारतासह, मलेशिया व इंग्लंड यांच्यात संघर्ष पाहायला मिळेल. मात्र त्यापलीकडे रोलँट ओल्टमन्स यांनी पाकिस्तान संघाचे प्रशिक्षकपद स्वीकारल्यामुळे भारताचे गटातील आव्हान अधिक खडतर होण्याची शक्यता आहे,’’ असे मत भारताचा माजी हॉकीपटू विरेन रस्कीन्हाने व्यक्त केले. ओल्टमन्स यांच्या मार्गदर्शनातील वैशिष्टय़ मांडताना रस्कीन्हा म्हणाला, ‘‘भारतीय खेळाडूंच्या शैलीचा ओल्टमन्स यांना अभ्यास आहे. त्यामुळे गटात भारत आणि पाकिस्तान समोर येतील त्या वेळी ओल्टमन्स त्याचा वापर करतील. भारताला त्यामुळे सोप्या वाटणाऱ्या या लढतीत चांगलाच घाम गाळावा लागू शकतो.’’

या वेळी त्याने महिला हॉकी संघाचे कौतुक केले. तो म्हणाला, ‘‘महिला संघाच्या सातत्यपूर्ण कामगिरीने मला प्रभावित केले आहे. आशिया चषक स्पर्धेत त्यांनी जपान, चीन व दक्षिण कोरिया या संघांना धूळ चारत जेतेपद पटकावले आहे.’’

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 30, 2018 3:13 am

Web Title: olympic athlete anjali bhagwat comment on indian shooters
Next Stories
1 मी खोटे बोललो! बँक्रॉफ्टची कबुली
2 ऑस्ट्रेलियाला नेस्तनाबूत करण्यासाठी आफ्रिका सज्ज
3 पुन्हा कार्तिक
Just Now!
X