धनंजय रिसोडकर, मुंबई

ज्या खेळाडूंनी हेतुपुरस्सर काही शारीरिक बदल केले असतील, त्यांना डावलणे कुणीही समजू शकते. मात्र निसर्गत: काही वेगळे गुणधर्म असलेल्या खेळाडूंवर अन्याय करणारे नियम मागे घेण्याचा आंतरराष्ट्रीय अ‍ॅथलेटिक्स महासंघाचा (आयएएएफ) निर्णय नक्कीच स्तुत्य आहे. परंतु ‘आयएएएफ’ने हा निर्णय यापूर्वीच घ्यायला हवा होता, असे मत भारतीय धावपटू द्युती चंदने व्यक्त केले.

‘आयएएएफ’ने नवीन नियम जाहीर करीत नैसर्गिकरीत्या ज्यांच्या शरीरात टेस्टेस्टेरॉन अतिरिक्त आहेत, अशा महिला धावपटूंनादेखील प्रस्तावित डायमंड लीगपासून खेळण्याची मुभा दिली आहे. त्या पाश्र्वभूमीवर ज्या भारतीय महिला धावपटूलादेखील अशाच अन्यायाचा सामना करावा लागला होता, त्या द्युतीने या निर्णयाचे स्वागत केले. ‘‘या निर्णयाने व्यक्तिश: मला खूप आनंद झाला आहे. त्याचबरोबर ही समस्या गेल्या दशकापासूनच जगभरात नजरेस आल्याने तेव्हापासूनच त्यावर काही तोडगा शोधायला हवा होता,’’ असे मतदेखील व्यक्त केले.

‘‘मला राष्ट्रकुलमध्ये पदक मिळाल्यानंतरही माझ्यावर अन्याय करण्यात आला होता. त्याचप्रमाणे भारतातील पिंकी प्रामाणिक, शांती सुंदरराजन यांच्यासह अन्य काही धावपटूंवरदेखील अन्याय झाला होता. नवीन नियमामुळे आता निदान यापुढे तरी अजून कुणावरही अशा प्रकारचा अन्याय होणार नाही अशी आशा वाटत आहे,’’ असे द्युतीने सांगितले.

‘‘मी सध्या ऑगस्ट महिन्यात होणाऱ्या आशियाई स्पर्धेवर लक्ष केंद्रित केले असून त्यात १०० मीटर आणि २०० मीटर या प्रकारात सुवर्णपदक मिळवणे, हेच माझे लक्ष्य आहे. हैदराबादच्या पी. गोपीचंद अकादमीकडून पूर्ण सहकार्य केले जात असून, प्रशिक्षक रमेश नागपुरी यांच्या मार्गदर्शनाखाली सध्या सराव सुरू आहे,’’ असे द्युतीने सांगितले.

नियम काय सांगतो?

  • ‘लैंगिक विकासातील बदल’ असे या नवीन नियमाचे नामकरण करण्यात आले आहे. पुरुषी संप्रेरकांचे प्रमाण निसर्गत: ज्यांच्यात जास्त आहे, मात्र नैसर्गिक पद्धतीने ते प्रमाण कमी करण्याचे प्रयास जे खेळाडू करीत आहेत, त्यांना या नवीन नियमानुसार आंतरराष्ट्रीय स्पर्धामध्ये सहभागी होता येणार आहे.
  • १ नोव्हेंबर २०१८पासून हा नवीन नियम अस्तित्वात येत आहे. टेस्टेस्टेरॉनचे प्रमाण कमी करण्यासाठी जे खेळाडू नैसर्गिकरीत्या उपचार घेऊन त्यावर मात करण्याचा प्रयास करत असतील, त्यांना अ‍ॅथलेटिक्सच्या स्पर्धेत सहभागी होऊ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ४०० मीटर, ८०० मीटर, १५०० मीटरच्या स्पर्धासाठी हा नियम लागू राहणार आहे.