शिवछत्रपती क्रीडानगरीत ऑलिम्पिक भवन उभारण्यात काही तांत्रिक अडचणी असल्या तरी या अडचणी दूर केल्या जातील व हे भवन लवकरच बांधले जाईल, असे राज्याचे उपमुख्यमंत्री व महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे (एमओए) अध्यक्ष अजित पवार यांनी सांगितले.
एमओएतर्फे ऑलिम्पिक दिनानिमित्त वेगवेगळ्या उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. पवार यांच्या हस्ते ज्येष्ठ ऑलिम्पिकपटू व आंतरराष्ट्रीय खेळाडू बाळकृष्ण अकोटकर, मारुती आडकर, बंडा पाटील, मनोज पिंगळे, धनराज पिल्ले, निखिल कानेटकर, गोपाळ देवांग, रमेश तावडे, तसेच अर्जुन पुरस्कार विजेते श्रीरंग इनामदार, शांताराम जाधव या खेळाडूंचा सत्कार करण्यात आला.
या वेळी पवार म्हणाले की, ‘‘ क्रीडानगरीतील वेगवेगळ्या सुविधा विविध खेळाडू व क्रीडा संघटनांना माफक दरात देण्याविषयी मी स्वत: मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार असून हा प्रश्न लवकरच सोडविला जाईल. मैदाने कमी होत आहेत, ही खंत असून मैदानांवरील खेळांचे आरक्षण राखण्यासाठी ठोस निर्णय घेतला जाणार आहे. आपल्या राज्यात आंतरराष्ट्रीय स्तरावर पदक मिळविण्याची क्षमता असणारे भरपूर क्रीडानैपुण्य उपलब्ध आहे. मात्र अशा नैपुण्याचा योग्य रीतीने विकास करण्याची आवश्यकता आहे. खेळाडूंनी शासनाने दिलेल्या सुविधांचा अधिकाधिक उपयोग करीत राज्याचा व देशाचा नावलौकिक उंचाविला पाहिजे.’’
या समारंभापूर्वी शनिवारवाडय़ापासून क्रीडाज्योत दौड आयोजित करण्यात आली होती व ऑलिम्पिक नेमबाज राही सरनोबत हिच्या हस्ते प्रारंभ करण्यात आला.