ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेत सलग दोन वेळा सुवर्णपदक जिंकणारा चीनचा सर्वोत्तम बॅडमिंटनपटू लिन डॅनने निवृत्ती पत्करली आहे.

‘‘२००० पासून खेळायला सुरुवात केल्यानंतर २०२० मध्ये म्हणजेच २० वर्षांनी आंतरराष्ट्रीय बॅडमिंटनमधून निवृत्त होत आहे. अर्थातच ही घोषणा करणे क्लेषकारक आहे. वयाच्या ३७व्या वर्षी तंदुरुस्ती पाहता माझ्या संघसहकाऱ्यांसोबत खेळू शकेन असे वाटत नाही. निवृत्तीनंतर कुटुंबाला वेळ द्यायचा आहे,’’ असे डॅन म्हणाला.

‘‘चार वेळा ऑलिम्पिकमध्ये देशाचे प्रतिनिधित्व केले. संपूर्ण कारकीर्दीत यश आणि अपयश दोन्ही अनुभवले. मात्र चिकाटीने खेळत राहण्याचा निर्धार उपयोगी पडला,’’ असे डॅनने सांगितले. गेले वर्षभर डॅनची कामगिरी खराब होत होती. जागतिक क्रमवारीतही त्याची १९व्या स्थानी घसरण झाली होती. या स्थितीत टोक्यो ऑलिम्पिकला पात्र ठरण्याच्याही फारशा अपेक्षा नव्हत्या. त्याच्याऐवजी चीनकडून शी युकी आणि चेन लाँग ऑलिम्पिकसाठी दावेदार आहेत.

लिन डॅनची यशस्वी कारकीर्द

*     ‘सुपर डॅन’ या टोपणनावाने ओळख

*     २००८ बीजिंग आणि २०१२ लंडन ऑलिम्पिकमध्ये सलग दोन सुवर्णपदके जिंकणारा पहिला बॅडमिंटनपटू

*     एकूण चार वेळा ऑलिम्पिक प्रतिनिधित्व

*     पाच विश्वविजेतेपदे आणि सहा वेळा ऑल इंग्लंडचे विजेतेपद

*     एकूण विजेतेपदे : ६६, एकूण विजय : ६६६

*     वयाच्या २८व्या वर्षी बॅडमिंटनमध्ये ऑलिम्पिकसह सर्व ९ मुख्य स्पर्धा जिंकणारा आजवरचा पहिला खेळाडू

*    अखेरचे विजेतेपद एप्रिल २०१९ मध्ये मलेशिया खुली स्पर्धा