पदक सोहळ्यातील वर्तनाबद्दल आशियाई ऑलिम्पिक समितीसमोर दिलगिरी व्यक्त केल्यानंतर भारताची बॉक्सर सरिता देवी हिचे कांस्यपदक प्रदान करण्याचा निर्णय घेण्यात आला.
यजमान दक्षिण कोरियाच्या खेळाडूविरुद्धच्या उपांत्य फेरीच्या लढतीत वर्चस्व गाजवल्यानंतरही सदोष पंचगिरीमुळे सरिताला पराभवाला सामोरे जावे लागले. या निर्णयाविरोधात तिने अपील केले, मात्र ते फेटाळण्यात आले. या प्रकाराने निराश झालेल्या सरिताने पदक प्रदान सोहळ्यात कांस्यपदक स्वीकारण्यास नकार दिला. थोडय़ाच वेळात रौप्यपदक विजेत्या कोरियाच्या खेळाडू्च्या गळ्यात हे पदक घातले. याप्रकरणी आशियाई ऑलिम्पिक समितीसमोर सुनावणी झाली.
या सुनावणीला भारतीय पथकाचे प्रमुख आदिल सुमारीवाला उपस्थित होते. ते म्हणाले, ‘पदक सोहळ्यातील सरिताच्या वर्तनाबद्दल मी दिलगिरी व्यक्त केली. भावनेच्या भरात हे कृत्य घडल्याचे मी सांगितले. त्यानंतर कांस्यपदक पुन्हा तिला प्रदान करण्यास समितीने मान्यता दिली. शुक्रवारी सकाळी सरिताला हे पदक प्रदान करण्यात येईल’. सरिता देवी पराभूत झालेल्या उपांत्य फेरीच्या सामन्याची स्वतंत्र समितीद्वारे चौकशी करण्याची मागणी परिषदेपुढे केल्याचे त्यांनी पुढे सांगितले. दरम्यान पदक प्रदान सोहळ्यातील वर्तनासाठी आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग महासंघातर्फे सरितावर निलंबनाची कारवाई होऊ शकते.