ऑलिम्पिकसाठी आतापासूनच खूप कडक सुरक्षाव्यवस्था केली असल्याची ग्वाही रिओतील पोलिसांकडून दिली जात असली तरी बंदुकीचा धाक दाखवत आपल्याला लुटल्याचा दावा स्पेनचा ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता यॉटिंगपटू फर्नाडो एचाव्हेरीने केला आहे.

‘‘मी माझ्या दोन सहकाऱ्यांसमवेत एका हॉटेलमध्ये नाश्ता घेण्यासाठी गेलो होतो. नाश्ता करून निवासस्थानाकडे चालत येत असताना ही घटना घडली. १६ वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या पाच तरुणांनी आम्हाला बंदुकीचा धाक दाखवला व चीजवस्तू देण्याची मागणी केली. जिवाच्या भीतीने आम्ही आमच्याकडील मोबाइल, काही इलेक्ट्रॉनिक वस्तू व परकीय चलन त्यांच्याकडे दिले. त्यांचे समाधान झाल्यानंतर ते पसार झाले,’’ असे फर्नाडोने सांगितले.

स्पेनचे तीन यॉटिंगपटू सांता तेरेसा येथे गेले दोन आठवडे सराव करीत आहेत. ते राहात असलेल्या परिसरात अनेक हॉटेल्स व बार आहेत. घटनेची अधिक माहिती देताना फर्नाडो म्हणाला, ‘‘आम्ही जवळचे अंतर असल्यामुळे पैसे वाचवण्यासाठी टॅक्सी केली नाही व चालत जाण्याचा निर्णय घेतला. आम्ही ही मोठी घोडचूक केली. येथून पुढे आम्ही अशी चूक करणार नाही. अन्य पर्यटक व खेळाडूंनी काळजी घेतली पाहिजे. ऑलिम्पिकचे आयोजन येथे होत असले तरी हे शहर सुरक्षित नाही. भरपूर सुरक्षाव्यवस्था करण्याची आवश्यकता आहे.’’

फर्नाडोला येथून जवळच असलेल्या कोपाकबाना येथे २००९मध्ये बंदुकीच्या धाकाद्वारे लुटण्यात आले होते. त्या वेळी तो व्हॉल्वो आंतरराष्ट्रीय शर्यतीत भाग घेण्यासाठी आला होता.

‘‘यंदा येथील परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली असल्याचे दिसून येत आहे. आम्हाला ज्या मुलांनी लुटले ते खूप व्यसनाधीन झालेले होते. प्रत्यक्ष स्पर्धेच्या वेळी किती गंभीर स्थिती असेल याची कल्पनाच करता येणार नाही,’’ असे फर्नाडोने सांगितले.

ऑलिम्पिकच्या वेळी ८५ हजारांहून अधिक सैनिक व पोलिसांमार्फत सुरक्षाव्यवस्था केली जाणार आहे. रिओतीलल राज्य पोलीस विभागप्रमुख होजे मारिआनो बेल्ट्राम यांनी ऑलिम्पिक स्पर्धेच्या ठिकाणी लष्कर तैनात केले जाणार असल्याचे नुकतेच जाहीर केले होते.

जागतिक यॉटिंग महासंघाचे प्रमुख अँडी हंट यांनी चोरीच्या घटनेचा निषेध करताना सांगितले की, ‘‘यॉटिंगच्या स्पर्धा मुख्य शहरांपासून थोडय़ाशा दूर ठिकाणी असल्यामुळे येथे अतिरिक्त सुरक्षाव्यवस्था केली जावी, असे मी येथील संयोजकांना सुचवले आहे. यॉटिंग स्पर्धेत सहभागी झालेले खेळाडू येथून एक ते दीड तास अंतरावर असलेल्या मुख्य क्रीडानगरीऐवजी यॉटिंग स्पर्धेजवळील हॉटेल्समध्ये राहण्याची शक्यता आहे. रिओत येणाऱ्या खेळाडूंना आवश्यक सुरक्षाव्यवस्था मिळाली पाहिजे. अर्थात, आम्ही खेळाडूंनाही संभाव्य धोक्यापासून जागरूक करीत आहोत. त्यांनी एकत्रित जावे व एकटय़ा-दुकटय़ाने जाण्याचे टाळावे, असेही आम्ही त्यांना सांगितले आहे.’’