तुषार वैती

नेमबाजी, कुस्ती, बॉक्सिंग हे भारताला ऑलिम्पिकमध्ये पदक मिळवून देणारे क्रीडाप्रकार. अलीकडे सायना नेहवाल आणि पी. व्ही. सिंधू यांच्या यशामुळे बॅडमिंटनमध्येही पदकाची अपेक्षा बाळगली जाऊ लागली. एकीकडे २०२०च्या टोक्यो ऑलिम्पिकमध्ये पदकांचा दुहेरी आकडा गाठणाऱ्या कामगिरीची अपेक्षा बाळगली जात असताना, भारत हे ध्येय साध्य करील का, याची उत्सुकता सर्वाना लागून राहिली आहे. काही दिवसांपूर्वीच जागतिक नेमबाजीत भारतीय खेळाडूंनी घवघवीत यश संपादन केले आणि आता जागतिक कुस्ती आणि बॉक्सिंग स्पर्धामध्येही भारताने आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी सादर करत ऑलिम्पिकसाठी सज्ज असल्याचे तूर्तास तरी दाखवून दिले आहे. मात्र वर्षभरात ऑलिम्पिकसाठी अधिकाधिक स्थान निश्चित करणे, हे खेळाडूंसमोर सर्वात मोठे आव्हान असणार आहे.

गेल्या दोन दशकांपासून भारतीय बॉक्सिंगने कात टाकली आहे. पण प्रशासनामधील कायमचा गोंधळ आणि सत्तेवर राहण्यासाठी प्रशासकांची सुरू असलेली धडपड यामुळे खेळ आणि खेळाच्या विकासाकडे कमालीचे दुर्लक्ष झाले. त्यातच व्यावसायिक बॉक्सिंगची पाळेमुळे देशात रुजू लागल्यानंतर अव्वल बॉक्सर्सनीही पैशांच्या हव्यासापोटी ती वाट धरली. पण पुरस्कर्त्यांच्या अभावामुळे व्यावसायिक बॉक्सिंगलाही भारतात रुजता आले नाही. परिणामी, भारतीय बॉक्सिंगची वाढ खुंटत गेली. आता प्रशासनामधील गोंधळ बाजूला सारून बॉक्सिंगमध्ये स्थित्यंतर घडवून आणण्याच्या प्रयत्नांचे फळ दिसून येत आहे. जागतिक बॉक्सिंग स्पर्धेत आतापर्यंत एका पदकावर समाधान मानणाऱ्या भारतासाठी यंदा दुग्धशर्करा योग ठरला. आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी आणि अंतिम फेरीत धडक मारण्याची किमया भारतीय बॉक्सर्सनी केली.

अमित पांघलने ५२ किलो वजनी गटात देशाला जागतिक स्पर्धेतील पहिले रौप्यपदक मिळवून दिले. गर्भारपणात पूर्ण वाढ न झाल्यामुळे अमितचे वजन आणि शरीरयष्टी नाजूकच राहिली. त्यामुळे आपला मुलगा भविष्यात काय करू शकेल की नाही, याची चिंता नेहमीच त्याच्या पालकांना लागून राहिलेली असायची. वयाच्या १२व्या वर्षी त्याने बॉक्सिंगला सुरुवात केली, तेव्हा त्याचे वजन अवघे २४ किलो होते. त्यामुळे ताकदीचा खेळ असलेल्या बॉक्सिंगमध्ये अमित कितपत तग धरू शकेल, याची कल्पना त्याचे प्रशिक्षक अनिल धारकर यांनाही नव्हती. पण जिद्द आणि आत्मविश्वासाच्या बळावर अमितने सर्व अडथळ्यांवर मात केली. २०१७मध्ये आंतरराष्ट्रीय बॉक्सिंगमध्ये पदार्पण केल्यानंतर अमितने थक्क करणारी प्रगती केली आहे. २०१८च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत रौप्य आणि त्याच वर्षी आशियाई स्पर्धेत सुवर्णपदक पटकावण्याची करामत करणाऱ्या अमितने जागतिक स्पर्धेतही भारताला पदक मिळवून दिल्यानंतर ऑलिम्पिकमध्ये पदकाचे आशास्थान म्हणून त्याच्याकडे पाहिले जात आहे. मनीष कौशिकच्या ६३ किलो वजनी गटातील कांस्यपदकामुळे भारताने यंदा पदकांची संख्या दुप्पट केली. २०१७मध्ये शिवा थापाला हरवून राष्ट्रीय विजेता होणाऱ्या हरयाणाच्या मनीषने राष्ट्रकुल स्पर्धेतील रौप्यपदकानंतर जागतिक स्पर्धेत आपल्या कर्तृत्वाची झलक दाखवली.

ग्रीको-रोमन कुस्ती प्रकारात भारताला म्हणावी तशी पकड घेता आली नाही. त्यामुळे यंदाही कुस्तीगीरांनी निराशा केल्यामुळे या प्रकारात भारताची पाटी कोरीच राहिली. याचा भारताला गांभीर्याने विचार करावा लागणार आहे. पण फ्रीस्टाइल प्रकारात तब्बल एक रौप्य आणि चार कांस्यपदकांची कमाई आणि चार ऑलिम्पिकमध्ये स्थान मिळवत भारतीय कुस्तीगीरांनी छाप पाडली. कुस्तीवर हरयाणाच्या खेळाडूंचे वर्चस्व असतानाही दिल्लीच्या छत्रसाल स्टेडियमच्या दीपक पुनिया आणि रवीकुमार दहिया या मल्लांनी अनुक्रमे रौप्य आणि कांस्यपदक पटकावले. घोटय़ाच्या दुखापतीमुळे दीपकला अंतिम फेरीच्या लढतीत मैदानात उतरला आले नाही. पण कडवा प्रतिकार केल्यानंतर हरलेल्या त्याच्या रौप्यपदकाचे मोल महत्त्वाचे ठरले असते. सर्वाच्या नजरा बजरंग पुनियावर लागलेल्या असताना उपांत्य फेरीतील त्याचा पराभव भारतासाठी मोठा धक्का होता. पंचांच्या कामगिरीवर नाराज झालेल्या बजरंगने कांस्यपदकासाठीच्या लढतीत न उतरण्याचा निर्णय घेतला होता. पण प्रशिक्षकांनी मन वळवल्यानंतर बजरंगने कांस्यपदकासह टोक्यो ऑलिम्पिकमधील स्थान मिळवले. महिलांमध्ये विनेश फोगट हीसुद्धा पदकाची दावेदार होती. पण पहिल्याच फेरीत पराभूत झाल्यावरही रिओ ऑलिम्पिकनंतरचा तिचा कणखर बाणा पाहायला मिळाला.

टोक्यो ऑलिम्पिकसाठी सहा महिन्यांपूर्वीच निवडण्यात आलेले इराणचे राष्ट्रीय प्रशिक्षक हुसेन करिमी हे देशातील कुस्तीच्या कारभाराबाबत नाराज आहेत. देशातील अव्वल मल्लांनी सोनपत येथील सराव शिबिरात एकत्र सराव करावा, असे त्यांचे म्हणणे आहे. पण बजरंग जॉर्जियाच्या शाको बेन्टिनिडिस यांच्या तर दोन ऑलिम्पिक पदकांचा मानकरी सुशील कुमार रशियाच्या कमल मालिकोव्ह यांच्या मार्गदर्शनाखाली कधी भारतात तर कधी परदेशात सराव करत असतात. भारतीय कुस्ती महासंघावरही उत्तरेकडचे वर्चस्व असल्यामुळे महाराष्ट्राच्या कुस्तीगीरांवर अन्याय हा आता नित्यनेमाचा झाला आहे. पण राहुल आवारेने मिळालेल्या संधीचे सोने केले आहे. आता ऑलिम्पिकमध्ये पदकाचे आशास्थान असलेल्या या खेळाडूंचे नाणे कितपत खणखणीत वाजते, यावर भारताचे पदकांचे यश अवलंबून असेल.

जागतिक कुस्ती स्पर्धेतील भारताची कामगिरी

खेळाडू            वजनी गट          पदक

दीपक पुनिया      ८६ किलो         रौप्य

रवी दहिया         ५७ किलो           कांस्य

राहुल आवारे        ६१ किलो         कांस्य

बजरंग पुनिया      ६५ किलो           कांस्य

विनेश फोगट         ५३ किलो         कांस्य

जागतिक बॉक्सिंग स्पर्धेतील भारताची कामगिरी

अमित पांघल       ५२ किलो         रौप्य

मनीष कौशिक       ६३ किलो         कांस्य

tushar.vaity@expressindia.com