नॉर्वेच्या कार्सटन वारहोमने मंगळवारी टोक्यो ऑलिम्पिकमध्ये पुरुषांच्या ४०० मीटर अडथळ्यांच्या शर्यतीमध्ये विश्वविक्रमी कामगिरी करत सुवर्णपदकावर आपलं नाव कोरलं. एका सेंकदांच्या अंतराने विश्वविक्रम मोडीत काढल्यानंतर यासंदर्भात समजल्यावर कार्सटनने सुपरमॅनप्रमाणे आपली जर्सी फाडून आनंद व्यक्त केला. विशेष म्हणजे कार्सटननंतर दुसऱ्या क्रमांकावर आलेल्या अमेरिकेच्या राइ बेंजामिननेही विश्वविक्रम मोडला.

दोन वेळा जागतिक विजते राहिलेल्या कार्सटनने मंगळवारी ४५.९४ सेकंदात अंतिम शर्यत पूर्ण केली. या शर्यतीचं विशेष म्हणजे यामध्ये सहभागी झालेल्या सातपैकी सहा खेळाडूंनी आपले राष्ट्रीय विक्रम मोडले. कार्सटनने यापूर्वी एक जुलै रोजी ओस्लोमध्ये ४६.७० सेकंदांचा विश्वविक्रम प्रस्थापित केलेला. मात्र आता त्यानेच आपला हा विक्रम मोडीत काढलाय.

याच शर्यतीमध्ये रौप्य पदक जिंकणाऱ्या बेजामिनने ४६.१७ सेकंदांचा वेळ घेत आपल्या स्वत:चा जुना विक्रम मोडीत काढला. ब्राझीलच्या एलिसन डोस सांतोसने या शर्यतीमध्ये कांस्य पदकावर नाव कोरलं. डोसने ४६.७२ सेकंदांमध्ये शर्यत पूर्ण केली. त्याने ०.०२ सेकंद आधी शर्यत पूर्ण केली असती तर एकाच वेळी सुवर्ण, रौप्य आणि कांस्य पदक जिंकणाऱ्या तिन्ही खेळाडूंनी विश्वविक्रम मोडण्याचा अनोखा योगायोग जुळून आला असता. तरी ही डोसची सर्वोत्तम कामगिरी ठरली. शर्यत जिंकल्यानंतर कार्सटनला त्याने स्वत:चाच विक्रम मोडल्याचं समजलं. केवळ सुवर्णपदच नाही तर आपण विश्वविक्रमालाही मागे टाकल्याचं समजल्यानंतर कार्सटनच्या आनंदाला पारावार उरला नाही आणि त्याने अंगावरील जर्सी फाडून ओरडत आनंद साजरा केला.

कार्सटनच्या या कामगिरीचा आणि आगळ्यावेगळ्या सेलिब्रेशनचा व्हिडीओ सध्या सोशल नेटवर्किंगवर व्हायरल होताना दिसत आहे. एवढ्या मोठ्या संख्येने कोणत्याही एकाच शर्यतीत एवढे विक्रम होण्याची ही मागील काही वर्षांमधील पहिली वेळ असल्याचंही सांगितलं जात आहे.