जानेवारी महिन्यात रंगणाऱ्या एफआयएच प्रो लीगच्या दुसऱ्या पर्वात भारतीय हॉकी संघ पदार्पण करणार आहे. टोक्यो ऑलिम्पिकच्या तयारीसाठी ही स्पर्धा खूप फायद्याची ठरणार आहे, असे मत भारताचा ड्रॅगफ्लिकर रुपिंदरपाल सिंग याने व्यक्त केले.

ऑलिम्पिक पात्रतेवर लक्ष केंद्रित केल्यामुळे हॉकी इंडियाने प्रो लीगच्या पहिल्या पर्वातून आपल्या पुरुष आणि महिला हॉकी संघांना माघार घेण्यास सांगितले होते. राऊंड-रॉबिन पद्धतीने १० देशांमध्ये खेळवण्यात येणाऱ्या या स्पर्धेतील भारताचा सलामीचा सामना पुढील वर्षी जानेवारी महिन्यात नेदरलँड्सशी होणार आहे.

‘‘२०२० ऑलिम्पिकसाठी आपली बलस्थाने आणि कच्चे दुवे काय आहेत, याची जाणीव भारतीय संघाला प्रो लीगद्वारे होणार आहे. पहिल्या मोसमापासूनच एफआयएच प्रो लीगला चांगले यश मिळाले आहे. त्यामुळे दुसऱ्या मोसमात खेळण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत. या स्पर्धेतील प्रत्येक सामना हा आमच्यासाठी कसोटीचा असणार आहे. पुढील काही महिन्यांत परदेशी दौरे असल्यामुळे आम्हाला आमच्या खेळात अधिक सुधारणा करता येईल,’’असे रुपिंदर म्हणाला.

‘‘ऑलिम्पिकसाठी पात्र ठरणे, हे आतापर्यंतचे आमचे ध्येय होते. ऑलिम्पिकच्या तयारीसाठी नऊ महिने शिल्लक असल्याने बलाढय़ संघाविरुद्ध सक्षमतेने खेळ करण्याचा आमचा प्रयत्न आहे,’’ असेही रुपिंदरपालने सांगितले.