सुमित मलिक (१२५ किलो) आणि सीमा बिस्ला (५० किलो) यांनी जागतिक ऑलिम्पिक पात्रता कुस्ती स्पर्धेच्या अंतिम फेरीत मजल मारून टोक्यो ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेसाठी पात्र होण्याचा मान मिळवला आहे. पुरुषांमध्ये अमित धनकर (७४ किलो) आणि सत्यवर्त कडियान (९७ किलो) तर महिलांमध्ये निशा (६८ किलो) आणि पूजा (७६ किलो) यांचे आव्हान संपुष्टात आले आहे.
फ्री-स्टाईल कुस्ती प्रकारात ऑलिम्पिकसाठी पात्र ठरलेला तो भारताचा चौथा मल्ल आहे. पुरुषांमध्ये रवी दहिया (५७ किलो), बजरंग पुनिया (६५ किलो) आणि दीपक पुनिया (८६ किलो) तर महिलांमध्ये विनेश फोगट (५३ किलो), अंशू मलिक (५७ किलो) आणि सोनम मलिक (६२ किलो) यांनी ऑलिम्पिकमधील स्थान आधीच निश्चित केले आहे. टोक्यो ऑलिम्पिकमध्ये प्रथमच भारताच्या चार कुस्तीपटू महिला सहभागी होत आहेत.
२०१८मधील ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता मलिक प्रथमच ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला आहे. गुडघ्याला झालेल्या दुखापतीमुळे २८ वर्षीय मलिकला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. सीमाने उपांत्य सामन्यात पोलंडच्या अ‍ॅना लुकासियाकला पराभूत केले.
पात्रता गटात धनकरने मोल्डोव्हाच्या मिहेल साव्हाकडून ६-९ असा पराभव पत्करला. सुरुवातीला धनकर ०-४ असा पिछाडीवर होता. परंतु त्यानंतर धनकरने सामना वाचवण्यासाठी शर्थीने प्रयत्न केला. परंतु तो अपयशी ठरला. त्यामुळे टोक्यो ऑलिम्पिकमध्ये ७४ किलो वजनी गटात भारताचा कोणताही स्पर्धक होणार नाही. कडियनने उपांत्यपूर्व सामन्यात बल्गेरियाच्या अहमद सुल्तानोव्हिच बाटाईव्हकडून पराभव पत्करला.

करोनाची लागण झाल्यामुळे नवीनची माघार
’ करोनाची लागण झाल्यामुळे भारताचा ग्रीको-रोमन कुस्तीपटू नवीन कुमारने स्पर्धेतून माघार घेतली आहे. ‘‘नवीन वगळता भारताच्या सर्व कुस्तीपटूंच्या करोना चाचणीचा अहवाल नकारात्मक आला आहे. त्याला कोणतीही लक्षणे नसून, तो सुरक्षित आहे. तो आमच्याच हॉटेलमध्ये विलगीकरणात आहे,’’ अशी माहिती भारताचे ग्रीको-रोमन प्रकारातील प्रशिक्षक हरगोविंद सिंग यांनी दिली. ग्रीको-रोमन प्रकाराच्या स्पर्धेला शनिवारपासून प्रारंभ होणार असून, या प्रकारातून भारताचा एकही खेळाडू ऑलिम्पिकसाठी पात्र ठरलेला नाही.