भारतीय महिला संघाचा कित्ता गिरवत पुरुष संघानेही २०२० टोकियो ऑलिम्पिकला पात्र होण्याच्या दृष्टीने पहिलं पाऊल टाकलं आहे. भुवनेश्वर शहरात झालेल्या पहिल्या सामन्यात भारतीय पुरुषांनी रशियाची झुंज ४-२ ने मोडून काढली.

अवश्य वाचा – Olympic Qualifier Hockey : भारतीय महिलांकडून अमेरिकेचा धुव्वा

जागतिक क्रमवारीत भारतीय संघ पाचव्या स्थानावर आहे. मात्र रशियाने या सामन्यात भारताला चांगली टक्कर दिली. हरमनप्रीतने १३ व्या मिनीटाला पेनल्टी स्ट्रोकवर गोल करत भारताचं खातं उघडलं. यानंतर पाठोपाठ १७ व्या मिनीटाला हरमनप्रीतने दुसऱ्यांदा चेंडू गोलपोस्टमध्ये ढकलत भारताची आघाडी वाढवली. दुसरीकडून रशियाच्या खेळाडूंनीही मग आपल्या खेळाची गती वाढवली.

रशियाकडून अँड्रे कुरेव्हने मैदानी गोल करत रशियाची पिछाडी एका गोलने कमी केली. मात्र मनदीप सिंहने २४ व्या मिनीटाला रशियाचा बचाव भेदत पुन्हा एकदा भारताला ३-१ अशा आघाडीवर नेलं. यानंतर रशियन खेळाडूंनी भारताचं आक्रमण थोपवून धरत चांगला बचाव केला. मात्र ४८ व्या मिनीटाला सुनिलने गोल करत रशियाला बॅकफूटला ढकललं. सामना संपायला अवघी काही मिनीटं शिल्लक असताना रशियाने पेनल्टी कॉर्नरवर गोल केला, मात्र तोपर्यंत भारताने सामन्यात आपला विजय निश्चीत केला होता.