दुसऱ्या सामन्यात ७-१ असा दणदणीत विजय

बाला देवी हिने केलेल्या चार गोलांच्या जोरावर भारतीय महिला फुटबॉल संघाने बांगलादेशचा ७-१ असा धुव्वा उडवला. २०२० एएफसी ऑलिम्पिक पात्रता फेरीच्या दुसऱ्या सामन्यात भारताने पूर्णपणे वर्चस्व गाजविले. बाला देवी हिच्यासह कमला देवीने दोन आणि संजूने एक गोल करत भारताच्या विजयात मोलाची कामगिरी बजावली.

नेपाळविरुद्धच्या पहिल्या सामन्यात १-१ अशी बरोबरी साधल्यानंतर भारतीय महिलांनी सुरुवातीपासूनच सामन्यावर प्रभुत्व मिळवले. आठ मिनिटांच्या अंतराने तीन गोल लगावल्यामुळे बांगलादेशच्या खेळाडूंना मोठा धक्का बसला होता. पाचव्या मिनिटाला रतनबाला देवीने केलेला प्रयत्न यशस्वी होऊ शकला नाही. सहा मिनिटांनंतर बांगलादेशची आघाडीवीर मोसम्मतने पुढे वाटचाल करत भारतीय बचावपटूंवर दडपण आणले. दलिमा चिब्बर हिने तिला गोल करण्यापासून रोखले.

१६व्या मिनिटाला मिळालेल्या पेनल्टीवर कमलादेवी हिने भारताचे खाते खोलले. पाच मिनिटांनंतर ग्रेस डँगमेईने दिलेल्या क्रॉसवर बाला देवीने आपला पहिला गोल करत भारताची आघाडी २-० अशी वाढवली. पुढच्याच मिनिटाला तिने आपला दुसरा गोल लगावला. बांगलादेशला २८व्या मिनिटाला गोल करण्याची संधी मिळाली होती, पण त्यांना गोलमध्ये रूपांतर करण्यात अपयश आले.

दुसऱ्या सत्रात मुसळधार पावसाला सुरुवात झाली, तरीही या सत्रात चार गोल लगावत भारताने आपले वर्चस्व सिद्ध केले. ५३व्या मिनिटाला कमलादेवीने उजव्या बाजूने मिळालेल्या क्रॉसवर आपला दुसरा गोल झळकावत भारताची आघाडी ४-० अशी वाढवली. बाला देवीने ६२व्या मिनिटाला हॅट्ट्रिक साधली. ७३व्या मिनिटाला संजूने भारतासाठी योगदान दिले. दोन मिनिटानंतर बाला देवीने वैयक्तिक चौथा गोल करत भारताला ७-० असे आघाडीवर आणले. सामना संपायला १० मिनिटे शिल्लक असताना बांगलादेशच्या कृष्णा राणी हिने गोल करत लाज राखली.

सुरुवातीलाच गोलची नामुष्की पत्करावी लागल्यामुळे बांगलादेशच्या खेळाडूंचा बचाव खिळखिळा झाला होता. त्याचा फायदा भारतीय महिला फुटबॉलपटूंनी उठवला. भारताना आतापर्यंत दोन सामन्यांत चार गुण मिळवत क गटात अव्वल स्थान प्राप्त केले आहे. भारताचा अखेरचा साखळी सामना म्यानमारशी मंगळवारी होणार आहे.