टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धा पुन्हा लांबणीवर टाकण्यात येणार अथवा रद्द होणार, या चर्चेने प्रतिष्ठेच्या स्पर्धेसाठी तयारी करणाऱ्या हजारो खेळाडूंच्या तयारीवर परिणाम होत आहे, अशी चिंता आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचे (आयओसी) अध्यक्ष थॉमस बाख यांनी व्यक्त केली आहे.

ही स्पर्धा आधीच एका वर्षांने लांबणीवर टाकण्यात आल्यानंतर या स्पर्धेसाठी अन्य दुसरी कोणतीही पर्यायी योजना नाही, असे ‘आयओसी’ आणि टोक्यो ऑलिम्पिक संयोजन समितीने स्पष्ट केले आहे. ही स्पर्धा रद्द होईल, या वृत्ताचे खंडन जपान सरकारने गेल्या आठवडय़ात केले होते.

‘‘ऑलिम्पिकबाबतच्या चर्चेने खेळाडूंच्या सरावात विघ्न येत आहे. खेळाडूंनी अनेक आव्हानांवर मात करून दैनंदिन सरावाला सुरुवात केली आहे. त्यामुळे त्यांनी आपले लक्ष विचलित करू नये. आम्ही कोणत्याही खेळाडूचे ऑलिम्पिकचे स्वप्न उद्ध्वस्त होऊ देणार नाही,’’ असे बाख यांनी म्हटले आहे.

ते म्हणाले की, ‘‘ऑलिम्पिक स्पर्धेसाठी तयारी करणाऱ्यांना मी शुभेच्छा देतो. अनेक देशांमध्ये करोना लसीकरणाला सुरुवात झाली असली तरी जपानमध्ये खेळाडूंना दाखल होण्यासाठी ही अट नक्कीच नसेल. खेळाडूंनी लसीकरणासाठी रांगेत उभे राहावे, अशी आमची इच्छा नाही. त्यांनी आपल्या खेळावर तसेच सरावावर लक्ष केंद्रित करावे, असे आम्हाला वाटते. ’’

चाहत्यांबाबत संयोजकांचे मौन

टोक्यो ऑलिम्पिकमध्ये चाहत्यांना प्रवेश देण्यात येणार की नाही, हे अद्यापही गुलदस्त्यातच आहे. ‘‘सध्या आम्ही अनेक पर्यायांचा विचार करत आहोत. चाहत्यांना प्रवेश नाकारणे हा त्यापैकी एक पर्याय असू शकतो. चाहत्यांविना ऑलिम्पिक स्पर्धा आयोजित करण्याची आमची इच्छा नाही. पण अन्य गोष्टींचाही विचार करावा लागेल,’’ असे संयोजन समितीचे अध्यक्ष योशिरो मोरी यांनी सांगितले.