करोनाच्या सावटाखाली टोकियो ऑलिम्पिक स्पर्धा २३ जुलैपासून खेळली जाणार आहे. या स्पर्धेसाठी ऑलिम्पिक समितीने कठोर नियमावली आखली आहे. या स्पर्धेला प्रेक्षकांच्या उपस्थितीवर बंदी घालण्यात आली आहे. तसेच विजयी स्पर्धकांना मेडल देण्यासाठीही नवे नियम आखण्यात आले आहेत. पूर्वीसारखं व्यासपीठावर बोलवून खेळाडूंच्या गळ्यात पदकं घातली जाणार नाहीत. करोनाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. त्याऐवजी ही पदकं एका ट्रेमधून समोर ठेवली जातील आणि विजेत्या स्पर्धकांना ती पदकं स्वत:च्या हाताने गळ्यात घालावी लागणार आहेत. यावेळी हस्तांदोलन करता येणार नाही.

“करोनाच्या पार्श्वभूमी लक्षात घेता स्पर्धकांच्या गळ्यात पदकं घातली जाणार नाहीत. सोशल डिस्टन्सिंगच्या नियमावलीमुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. विजेत्यांसमोर एका ट्रेमध्ये पदकं ठेवली जातील आणि त्यांनी स्वत:हून आपल्या गळ्यात ती पदकं घालायची आहेत. ट्रेमध्ये पदकं सुरक्षितरित्या ठेवली जातील. यावेळी त्या पदकांना थेट स्पर्श होणार नाही याची काळजी घेण्यात आली आहे. व्यवस्थापक आणि स्पर्धकांना यावेळी मास्क घालणं अनिवार्य असणार आहे”, असं आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचे अध्यक्ष थॉमस बॅच यांनी सांगितलं. टोकियोत १४ जुलैला १ हजार १४९ नव्या करोनाबाधितांची नोंद झाली आहे. करोनाची वाढती रुग्णसंख्या पाहता जपान सरकारनं आपत्कालीन परिस्थितीची घोषणा केली आहे. करोना साथीच्या काळातही होणाऱ्या ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेसाठी यजमान जपानचे महापथक सज्ज झाले आहे. या चमूत विक्रमी ५८२ क्रीडापटूंशिवाय अन्य अधिकाऱ्यांचा समावेश आहे.

…म्हणून बर्गर किंग आउटलेटच्या कर्मचाऱ्यांनी दिला सामूहिक राजीनामा!

टोकियो ऑलिम्पिकच्या १८ स्पर्धामध्ये भारतीय खेळाडू खेळताना दिसणार आहेत. गेल्या वर्षी करोना संकटामुळे ऑलिम्पिक स्पर्धा पुढे ढकलण्यात आली होती. भारताकडून यावेळी १२६ स्पर्धकांनी स्पर्धेत भाग घेतला आहे. आतापर्यंत स्पर्धेत भाग घेणाऱ्या खेळाडूंची ही सर्वाधिक संख्या आहे. टोकियो ऑलिम्पिक स्पर्धा २३ जुलै ते ८ ऑगस्ट दरम्यान आहे.