आंतरराष्ट्रीय नेमबाज राही सरनोबतचे मत * २५ मीटरची ऑनलाइन स्पर्धा नसल्याची खंत

सुप्रिया दाबके , लोकसत्ता

करोना विषाणू संसर्गामुळे ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा लांबणीवर पडल्याने यजमान जपानलाही आर्थिक फटका बसला आहेच. जोपर्यंत करोनामधून संपूर्ण जग बाहेर येत नाही, तोपर्यंत तरी ऑलिम्पिक स्पर्धाचे आयोजन करणे कठीण आहे, असे मत कोल्हापूरची आंतरराष्ट्रीय नेमबाज राही सरनोबतने व्यक्त के ले आहे.

करोनामुळे क्रीडाविश्वावर काय परिणाम होईल, या प्रश्नाला उत्तर देताना राही म्हणाली, ‘‘टोक्यो ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा एका वर्षांने लांबणीवर पडली आहे. ऑलिम्पिकसाठी जे खेळाडू पात्र ठरले आहेत, त्यांची यामुळे निराशा होणे स्वाभाविक आहे. मात्र त्याकडे निराशा म्हणून न पाहता तयारीसाठी अधिक वेळ मिळाला हे समजून मी सज्ज होत आहेया वर्षांत कोणत्याही क्रीडा स्पर्धा होतील असे मला वाटत नाही. त्यातच खेळ हे सध्याच्या काळात कोणासाठीच पहिल्या पसंतीचे राहिलेले नाही.’’

लंडन ऑलिम्पिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणारी राही म्हणाली की, ‘‘ऑलिम्पिक लांबणीवर पडल्याने दडपण अजिबात घेतलेले नाही, कारण प्रत्येक खेळाडूच्या आयुष्यात दोन ते तीन ऑलिम्पिक स्पर्धा येतातच. ऑलिम्पिकनंतर राष्ट्रकुल आणि आशियाई स्पर्धादेखील आहेतच. टोक्यो ऑलिम्पिकची चार वर्षांपासून तयारी करत होतो. मात्र आता ऑलिम्पिक लांबणीवर पडल्याने  प्रत्येक पात्र खेळाडूला संपूर्ण नियोजन नव्याने करावे लागणार आहे. सातत्य टिकवणे हेदेखील या संपूर्ण काळात महत्त्वाचे आहे. त्यातच सध्या जो आराम खेळाडूंना मिळाला आहे, तो नव्याने पूर्णपणे सज्ज होण्यासाठी महत्त्वाचा ठरणार आहे. सध्याची परिस्थिती कोणाच्याच हातात नाही. तेव्हा आहे, त्या परिस्थितीला संयमाने सामोरे जाता आले पाहिजे.’’

करोनाच्या काळात घरात राहून तंदुरुस्तीवर मेहनत घेत असल्याचे टोक्यो ऑलिम्पिकसाठी स्थान निश्चित करणाऱ्या राहीने सांगितले.

‘‘तंदुरुस्ती राखण्यासाठी वैयक्तिक प्रशिक्षकांनी मला दैनंदिन कार्यक्रम आखून दिला आहे. जिममध्ये असणारी सर्वच व्यायामाची साधने घरात नसली तरी उपलब्ध साधनांसह तंदुरुस्तीवर मेहनत घेत आहे. सकाळी ६ ते ८ व्यायाम करताना प्राणायामदेखील करते. नेमबाजीसाठी आवश्यक व्यायाम करते. भारतीय क्रीडा प्राधिकरणाकडूनही दररोज ऑनलाइन सत्र चालवण्यात येतात. त्यात अधूनमधून सहभागी होते,’’ असे राहीने सांगितले.

’ऑनलाइन नेमबाजी स्पर्धा

सध्या करोनाच्या काळात सुरू आहेत. मात्र २५ मीटर अंतराची स्पर्धा नसल्याने सहभाग घेतला नसल्याचे तिने स्पष्ट केले.

’‘‘ऑनलाइन नेमबाजी ही संकल्पना चीनमध्ये खूप आधीपासून आहे. चीनची लोकसंख्या पाहता तेथे नेमबाजांची संख्याही मोठी आहे. या स्थितीत ऑनलाइन नेमबाजी स्पर्धेला चीनमध्ये चांगला प्रतिसाद मिळतो.

’ भारताची लोकसंख्यादेखील मोठी आहे. सर्वच खेळाडूंना प्रवासाचा खर्च झेपतो असे नाही. त्यामुळे अनेकांना स्पर्धाना मुकावे लागते.

’ऑनलाइन नेमबाजी ही चांगली संकल्पना आहे. करोनानंतर ऑनलाइन नेमबाजी स्पर्धा आयोजित केल्या जातील असे मला वाटते.