नवी दिल्ली : करोना साथीच्या पार्श्वभूमीवर ऑलिम्पिक वर्षभराने लांबणीवर पडल्याने मला खांद्याच्या दुखापतीतून सावरण्याबरोबरच अधिक उत्तम प्रकारे या स्पर्धेसाठी तयारीसाठी वेळ मिळाला, अशी कबुली भारताची टोक्यो ऑलिम्पिक रौप्यपदक विजेती वेटलिफ्टिंगपटू मीराबाई चानूने दिली.

मणिपूरच्या २६ वर्षीय मीराबाईने यंदाच्या ऑलिम्पिकमधील पहिल्याच दिवशी भारताचे पदकखाते उघडले. ४९ किलो वजनी गटात ऐतिहासिक कामगिरी करणाऱ्या मीराबाईचे सोमवारी मायदेशी आगमन झाले. गतवर्षी मार्च महिन्यात करोनामुळे देशभरात टाळेबंदी लागू करण्यात आल्याने मीराबाईच्या सरावात खंड पडला. काही महिन्यांच्या अवधीनंतर पुन्हा सरावाला प्रारंभ करताना तिला अनेक अडथळ्यांचा सामना करावा लागला. मात्र, यादरम्यानच ऑलिम्पिकसुद्धा लांबणीवर पडल्याने ही बाब एक प्रकारे मीराबाईच्या पथ्यावर पडली.

‘‘टाळेबंदीतील सुरुवातीच्या काही महिन्यांनंतर जेव्हा मी सरावाला प्रारंभ केला, त्या वेळी माझा उजवा खांदा फार दुखत होता. त्याशिवाय पाठीचाही त्रास जाणवू लागला. मला कोणतीही गंभीर दुखापत झाली नाही; परंतु अधिक वजनाच्या वस्तू उचलणे मला जमत नव्हते,’’ असे मीराबाई म्हणाली.

‘‘बऱ्याच कालावधीनंतर सराव केल्याने कदाचित तसे झाले असावे. मात्र त्यानंतर ऑलिम्पिक लांबणीवर पडल्याने मला शारीरिक तंदुरुस्तीकडे लक्ष देण्यास पुरेसा वेळ मिळाला. ऑलिम्पिकपूर्वी अमेरिकेत जाऊन ५० दिवसांच्या शिबिरात अथक परिश्रम केल्यावर मला आपण स्पर्धेसाठी पूर्णपणे तयार असल्याची खात्री पटली,’’ असेही मीराबाईने सांगितले. टाळेबंदी लागू असताना मीराबाई पतियाळा येथील राष्ट्रीय क्रीडा संस्थेत (एनआयएस) वास्तव्यास होती.

रेल्वेकडून दोन कोटींचे पारितोषिक

ऑलिम्पिकमधील गौरवास्पद कामगिरीबद्दल मीराबाईला रेल्वेकडून दोन कोटी रुपयांचे पारितोषिक जाहीर करण्यात आले असून तिची पदोन्नतीसुद्धा झाली आहे. भारताचे रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी मीराबाईचा सत्कार करतानाच याविषयी अधिकृतरीत्या घोषणा केली. ‘‘भारताची शान मीराबाई चानूची भेट घेऊन तिचा सत्कार केल्याचा आनंद आहे. तिला रेल्वेकडून दोन कोटी रुपयांचे पारितोषिक देण्यात येणार असून ईशान्य सीमेवरील रेल्वे विभागात तिची पदोन्नती करण्यात येईल,’’ असे ‘ट्वीट’ वैष्णव यांनी केले.