ओमान आणि स्कॉटलंड या संघांमध्ये झालेल्या एकदिवसीय सामन्यांत स्कॉटलंडच्या संघाने १० गडी आणि तब्बल २८० चेंडू राखून विजय मिळवला. ओमानच्या संघाचा पूर्ण डाव केवळ २४ धावांत संपुष्टात आला होता. या आव्हानाचा पाठलाग करताना केवळ २० चेंडूत स्कॉटलंडने विजय मिळवला.

स्कॉटलंडच्या संघाने जाणेफेकी जिंकून प्रथम ओमानच्या संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केले. मात्र ओमानच्या पूर्ण संघ १७.१ षटकांत अवघ्या २४ धावांवर बाद झाला. सामन्याच्या दुसऱ्याच चेंडूवर अलस्डेर इव्हान्सने जतिंदर सिंगला (०) बाद केले आणि बळी मिळवण्यास सुरुवात केली. पुढच्याच षटकात स्मिथने ट्विंकल भंडालीला याला शून्यावर तंबूत धाडले. त्यानंतर मात्र ओमान संघाच्या डावाला स्थैर्य मिळू शकले नाही. खावर अलीने केलेल्या १५ धावा वगळता ओमानच्या एकाही फलंदाजाने दुहेरी आकडा गाठला नाही. सहा फलंदाज तर शून्यावरच माघारी परतले. स्कॉटलंडकडून स्मिथने ८ षटकांत ७ धावा देऊन ४ बळी घेतले. तर अड्रीयन नेलनेही ४.१ षटकांत ७ धाव खर्चून ४ टिपले. इव्हान्सला २ गडी मिळाले.

 

२५ धावांचे लक्ष्य स्कॉटलंडने फक्त ३.२ षटकांत म्हणजेच २० चेंडूत पूर्ण केले. सलामीवीर मॅथ्यू क्रॉस (१०) व कायल कोएत्झर (१६) यांनी ओमानला सहज पराभूत केले. मात्र हा सामना ICC चा official सामना नसल्यामुळे स्कॉटलंडला मोठा विजय मिळवूनही दिग्गज संघाचा विक्रम मोडता आला नाही. गवसणी घालता आली नाही.

लिस्ट A क्रिकेटमध्ये ओमानची धावसंख्या ही चौथी नीचांकी खेळी ठरली. या आधी विंडीजच्या १९ वर्षांखालील संघाचा २००७ मध्ये बार्बाडोस संघाने १८ धावात खुर्दा उडवला होता. तर २०१२ मध्ये सॅरॅसेन्स एससीचा कोल्ट्स एससीने १९ धावांत आणि १९७४ मध्ये मिडलेसेक्सचा यॉर्कशायर संघाने २३ धावांत डाव गुंडाळला होता.