आशियाई चॅम्पियन्स चषक हॉकी स्पर्धा

आशियाई क्रीडा स्पर्धेत विजेतेपद कायम राखण्यात अपयशी ठरलेल्या भारतीय हॉकी संघासमोर आशियाई चॅम्पियन्स चषकातील पहिल्याच सामन्यात यजमान ओमानचे आव्हान असेल.

भारताला जकार्तामध्ये सुवर्णपदकाचा दावेदार मानले जात असताना केवळ कांस्यपदकावर समाधान मानावे लागले होते. त्यामुळे निदान या स्पर्धेत तरी भारताकडून दमदार कामगिरीची अपेक्षा बाळगली जात आहे. या स्पर्धेत आशियातील अग्रमानांकित देश म्हणून भारत खेळणार आहे. यापूर्वी २०१४ साली झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताने ओमानला ७-० असे पराभूत केले होते. मात्र, त्यानंतर आता चार वर्षांचा कालावधी उलटला असून ओमानचा संघ घरच्या मैदानावर खेळणार असल्याचा त्यांना लाभ मिळू शकतो. तरीही या लढतीत भारताचे पारडे जड मानले जात आहे. या सामन्याबाबत बोलताना प्रशिक्षक हरेंद्रसिंग यांनी सांगितले की, ‘‘या सामन्याच्या निमित्ताने भारताला यजमानांसमोर खेळण्याची चांगली संधी आहे. तसेच गटातील मलेशिया, पाकिस्तान, जपान आणि दक्षिण कोरियाशी लढत देण्यासाठी संघ सज्ज आहे. सुरुवात चांगली करून नंतरच्या सामन्यांसाठी आत्मविश्वास वाढविण्याचा आमचा प्रयत्न असेल.’’

गतविजेत्या भारताने २०१६ मध्ये पाकिस्तानला अंतिम फेरीत ३-२ असे पराभूत करत या स्पर्धेचे जेतेपद पटकावले होते. मात्र हा करंडक पुन्हाजिंकायचा असेल तर भारताला कमीत कमी चुका कराव्या लागतील, असे हरेंद्र सिंग यांना वाटते. ‘‘जगातील कोणत्याही संघाला पराभूत करण्याची क्षमता आमच्यात आहे, हे आम्ही जाणतो. मात्र काही वेळेला गोष्टी आपल्या मनाविरुद्ध घडतात. त्यामुळे ६० मिनिटांच्या खेळावर लक्ष केंद्रित करणे महत्त्वाचे ठरेल. त्याचबरोबर प्रतिस्पध्र्याना गोल करण्याच्या कमीत कमी संधी द्याव्या लागतील,’’ असेही त्यांनी सांगितले.

सलामीच्या लढतीनंतर भारताला २० ऑक्टोबर रोजी पाकिस्तानशी लढत द्यावी लागेल. त्यानंतर भारताला २१ ऑक्टोबरला जपानशी, २३ ऑक्टोबरला मलेशियाशी आणि २४ ऑक्टोबरला दक्षिण कोरियाशी दोन हात करावे लागतील. भारत आणि पाकिस्तानने प्रत्येकी दोन वेळा ही स्पर्धाजिंकली असून तिसऱ्यांदा जेतेपद पटकावण्यासाठी भारत सज्ज झाला आहे.