करोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे सध्या जगभरात आणीबाणीची परिस्थिती निर्माण झालेली आहे. प्रादूर्भावाचा सामना करण्यासाठी भारतात केंद्र सरकारने ३१ मे पर्यंत लॉकडाउनचा चौथा टप्पा वाढवला आहे. या खडतर काळात सोमवारी संपूर्ण देशभरात मुस्लीम बांधवांनी आपल्या घरात राहूनच ईद साजरी केली. एरवी ईदच्या दिवशी भारतातील महत्वाच्या शहरांतील मुस्लीमबहुल भागांत चांगलीच रेलचेल असते. मुलांसाठी नवीन कपड्यांची खरेदी, खाण्यापिण्यासाठी सर्व मुस्लीम बांधव घराबाहेर येतात. मात्र लॉकडाउनमुळे अनेक भागात आज घरातच हा सण साजरा करण्यात आला.

भारतीय संघाचा महत्वाचा गोलंदाज मोहम्मद शमीनेही आज घरातच ईद साजरी केली. यावेळी आपले मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांना मोहम्मद शमीने ट्विटरवर खास मटन बिर्याणी आणि खीर असा एक फोटो टॅग करत तुमच्यासाठी पाठवतोय, थोड्यावेळात तुमच्यापर्यंत पोहचेल असं ट्विट केलं.

शमीच्या या ट्विटला नेटकऱ्यांनी चांगली पसंती दर्शवली आहे. सध्याच्या खडतर काळात भारतीय लोकं आपली जात, धर्म, पंथ विसरुन एकमेकांच्या मदतीसाठी पुढे येत आहेत. ईद साजरी करण्याच्या काही दिवस आधी दिल्लीत काही शीख तरुणांनी जामा मशीद सॅनिटाईज केली होती. अशाच प्रसंगांमुळे जगभरात भारताचं वेगळेपण सिद्ध होतं.