18 November 2017

News Flash

धोनीच्या तालावर..

* कर्णधार धोनीच्या नाबाद द्विशतकी खेळीचा झंझावात * विराट कोहलीनेही साकारले शानदार

पीटीआय, चेन्नई | Updated: February 25, 2013 2:27 AM

 पण समस्त क्रिकेटरसिकांचा हा ‘सुपर संडे’ भारताचा संघनायक महेंद्रसिंग धोनीने आपल्या नजाकतभऱ्या नाबाद द्विशतकाने साजरा केला. चेन्नई सुपर किंग्जच्या या नायकाने चेपॉकवर चौकार-षटकारांची बरसात करीत ‘धोनीच्या तालावर..’ अक्षरश: ऑसी गोलंदाजांना नाचवले. याव्यतिरिक्त विराट कोहलीच्या शानदार शतकाचीही खमंग मेजवानी होतीच. त्यामुळे भारताने तिसऱ्या दिवसअखेर ८ बाद ५१५ धावांचा डोंगर उभारून १३५ धावांच्या आघाडीसह पहिल्या कसोटीवर नियंत्रण घट्ट केले आहे.
धोनीने रविवारी मुक्त छंदातल्या कवितेप्रमाणे फटक्यांची मनसोक्त उधळण करीत ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांचे कंबरडे मोडले. हे त्याचे कसोटी कारकीर्दीतील पहिले द्विशतक तर सहावे शतक. तथापि, त्याआधी कोहलीने कसोटी क्रिकेटमधील चौथ्या शतकाची नोंद केली, पण त्याच्या फलंदाजीत विलक्षण संयमीपणा पाहायला मिळाला.
एम. ए. चिदम्बरम स्टेडियमवर रविवारी ‘सुपर सचिन शो’ पाहण्यासाठी आलेल्या क्रिकेटरसिकांची सकाळी सचिन तेंडुलकर ८१ धावांवर बाद झाल्यामुळे घोर निराशा झाली. लिऑनच्या चेंडूवर चकलेल्या सचिनचा त्रिफळा उडाला आणि ऑसी संघाने जल्लोष साजरा केला. २४ फेब्रुवारी या आपल्यासाठी खास असलेल्या दिवशी सचिन आपल्या धावसंख्येत फक्त १० धावांची भर घालू शकला. परंतु धोनीने मैदानावर आपल्या फटक्यांची लाजवाब अदाकारी पेश करीत क्रिकेटरसिकांना मंत्रमुग्ध केले. त्याने २४३ चेंडूंत २२ चौकार आणि ६ षटकार खेचत आपली नाबाद २०६ धावांची खेळी साकारली. प्रारंभी धोनीने ट्वेन्टी-२० किंवा एकदिवसीय क्रिकेटप्रमाणे आक्रमक पवित्रा घेत ऑस्ट्रेलियन गोलंदाजांची लय बिघडवली. गेल्या वर्षी नागपूरमध्ये इंग्लंडविरुद्धच्या अखेरच्या कसोटी सामन्यात धोनी ९९ धावांवर धावचीत झाला होता. परंतु रविवारी धोनीने कसोटी क्रिकेटमधील आपली सर्वोच्च धावसंख्या (१४८, पाकिस्तानविरुद्ध) मागे टाकली आणि धावांचा नवा अध्याय लिहिला.
उपाहारापूर्वी सचिन बाद झाल्यानंतर भारतीय गोटात चिंतेचे वातावरण होते, पण दुसऱ्या नव्या चेंडूने ऑस्ट्रेलियाची स्थिती आणखी बिकट केली. धोनी आणि कोहली यांनी आस्ट्रेलियाच्या गोलंदाजांवर हल्लाबोल करीत पाचव्या विकेटसाठी १२८ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी केली. ऑस्ट्रेलियाच्या धावसंख्येपासून भारत ५६ धावांच्या अंतरावर असताना लिऑनने ही जोडी फोडली. लिऑनला मिड-ऑनच्या डोक्यावरून फटका खेळण्याचा कोहलीचा प्रयत्न फसला आणि मिचेल स्टार्कने अप्रतिम झेल टिपला. कोहलीने २०६ चेंडूंत १५ चौकार आणि एका षटकारासह आपली १०७ धावांची खेळी साकारली.
कोहली बाद झाल्यावर रवींद्र जडेजा (१६), आर. अश्विन (३) आणि हरभजन सिंग (११) हे तीन फलंदाज झटपट बाद झाले. त्यामुळे भारताची ८ बाद ४०६ अशी स्थिती झाली, पण तरीही धोनीचा आत्मविश्वास अढळ होता. पदार्पणवीर भुवनेश्वर कुमारच्या (नाबाद १५) साथीने धोनीने नवव्या विकेटसाठी नाबाद १०९ धावांची भागीदारी रचून त्याने संघाला पाचशेच्या पल्याड नेले. धोनीने आपले शतक फक्त ११९ चेंडूंत पीटर सिडल याला फाइन लेगच्या दिशेने चौकार लगावत पूर्ण केले. त्यानंतर लिऑनला शॉर्ट थर्ड मॅनला एकेरी धावा काढत धोनीने आपले दुसरे शतक फक्त ११२ चेंडूंत साजरे केले आणि बॅट उंचावली. तेव्हा चेन्नईवासीयांनी त्याला टाळ्यांच्या गजरात अभिवादन केले.
तिसऱ्या दिवसअखेर
भारत ८ बाद ५१५
सत्र        धावा/बळी
पहिले सत्र    ८१/१
दुसरे सत्र        १०८/२
तिसरे सत्र     १४४/२धोनीमहिमा!

२०६*
*   भारतीय यष्टिरक्षकाच्या सर्वोच्च धावा उभारताना धोनीने १९६४मध्ये बुधी कुंदरन यांनी इंग्लंडविरुद्ध केलेल्या १९२ धावांचा विक्रम मोडीत काढला.
*   धोनीचे कसोटी कारकिर्दीतील पहिलेवहिले द्विशतक.

४,०८९
*  धोनीने आपल्या नाबाद द्विशतकी खेळीनिशी कसोटी क्रिकेटमधील चार हजार धावांचा टप्पा ओलांडला.
धावफलक
ऑस्ट्रेलिया (पहिला डाव) : ३८०
भारत (पहिला डाव) : मुरली विजय त्रिफळा गो. पॅटिन्सन १०, वीरेंद्र सेहवाग त्रिफळा गो. पॅटिन्सन २, चेतेश्वर पुजारा त्रिफळा गो. पॅटिन्सन ४४, सचिन तेंडुलकर त्रिफळा लिऑन ८१, विराट कोहली झे. स्टार्क गो. लिऑन १०७, महेंद्रसिंग धोनी खेळत आहे २०६, रवींद्र जडेजा त्रिफळा गो. पॅटिन्सन १६, आर. अश्विन त्रिफळा गो. लिऑन ३, हरभजन सिंग त्रिफळा गो. हेन्रिक्स ११, भुवनेश्वर कुमार खेळत आहे १६, अवांतर (बाइज-२, लेगबाइज-१४, वाइड-३) १९, एकूण १४१ षटकांत ८ बाद ५१५
बाद क्रम : १-११, २-१२, ३-१०५, ४-१९६, ५-३२४, ६-३६५, ७-३७२, ८-४०६
गोलंदाजी : मिचेल स्टार्क २५-३-७५-०, जेम्स पॅटिन्सन २६-५-८९-४, पीटर सिडल २२-५-६१-०, नॅथन लिऑन ४०-१-१८२-३, मोझेस हेन्रिक्स १४-४-४८-१, मायकेल क्लार्क ८-२-२५-०, डेव्हिड वॉर्नर ३-०-१९-०.
अश्विनला दंड
चेन्नई : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) गणवेश आणि साहित्य यांच्या संदर्भातील नियमाचा भंग केल्याप्रकरणी सामन्याच्या मानधनाच्या १० टक्के दंड ठोठावण्यात आला आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात अश्विन फलंदाजीला उतरला तेव्हा त्याच्या पॅडवर आयसीसीच्या मर्यादेपेक्षा अधिक उत्पादकांचे बोधचिन्ह (लोगो) होते. आयसीसीच्या सामन्यामधील गणवेश आणि साहित्यासंदर्भातील कलम २.१.१ या नियमाचा भंग अश्विनने केला.

First Published on February 25, 2013 2:27 am

Web Title: on the rhythm of dhoni